"बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:45 AM2024-03-02T09:45:58+5:302024-03-02T10:06:27+5:30

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे. 

"A frog feels like a bull; Even the road in front of his own house could not be done. Rupali chakankar on amol kolhe | "बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही"

"बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही"

मुंबई - शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपात तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धक होते. यंदाचीही अमोल कोल्हेंनी शड्डू ठोकला असून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, याचीच चर्चा होत आहे. त्यावरुन, कोल्हेंवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे. 

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर तत्कालीन २०१९ चे शिरुर उमेदवार आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले. विरोधकांना उमेदवार आयात करावा लागतो, हाच माझा विजय असल्याचं कोल्हेंनी म्हटलं. कोल्हेंच्या या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली. ''अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघासंदर्भात केलेले दावे म्हणजे बेडकाने छाती फुगवण्याचा प्रकार'' असल्याचे त्यांनी म्हटले. शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
''शिरुरमध्ये महायुतीला उमेदवार मिळत नाही, ही अमोल कोल्हे यांची भाषा हास्यास्पद आहे. बेडकाने छाती फुगवली की त्याला बैल झाल्यासारखे वाटते, असा हा प्रकार आहे. शिरुर मतदारसंघात कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता नाटकाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अमोल कोल्हे यांना स्वत:च्या घरासमोरचा रस्ताही गेल्या पाच वर्षात नीट करता आला नाही. तरीही त्यांच्यात इतका आत्मविश्वास येतो कुठून, हाच प्रश्न मला पडल्याचे चाकणकर यांनी म्हटले. 

हीच कामाची पोचपावती - कोल्हे

"आपण महायुतीची ताकद बघत असाल तर, जवळपास दोनशे आमदार, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे. एवढी मोठी ताकद असताना आपण ज्या दोनही उमेदवारांची नावे घेतली आणि शक्यता व्यक्त केल्या, त्यात शिवाजीराव आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजित दादांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर? किंवा प्रदीप दादा कंद हे भाजपकडून अजित दादांच्या राष्ट्रवादीकडे येणार. याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून, म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागणार आहे. गेली पाच वर्षे माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कामाची ही पोचपोवती आहे," असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 

जागा राष्ट्रवादीलाच सुटणार?

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत शिरूरची जागा महायुतीकडून राष्ट्रवादीलाच देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

 

Web Title: "A frog feels like a bull; Even the road in front of his own house could not be done. Rupali chakankar on amol kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.