राज्यात ४५ ट्राॅमा केअर सेंटर्स उरले केवळ कागदावरच..!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:39 PM2022-04-19T12:39:24+5:302022-04-19T12:40:45+5:30

मुंबई, ठाणे, नवी मुुंबई : अपघातात ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमधील मदतीचे पहिले ठिकाण असलेली एकूण ...

45 trauma care centers left in the state only on paper | राज्यात ४५ ट्राॅमा केअर सेंटर्स उरले केवळ कागदावरच..!

सांकेतिक छायाचित्र

Next

मुंबई, ठाणे, नवी मुुंबई : अपघातात ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमधील मदतीचे पहिले ठिकाण असलेली एकूण १०८ ट्रॉमा केअर सेंटर्स राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी मंजूर केली होती. त्यापैकी या घडीला ६३ सेंटर्स कार्यरत असून, ४५ सेंटर्स कागदावरच आहेत. या ४५ पैकी १५ सेंटर्सचे बांधकाम सुरू आहे, तर ३० सेंटर्सचे आराखडे तयार करण्यापासूनचे काम सुरू आहे. 

राज्यात या ट्रॉमा केअर सेंटर्समध्ये २०२१-२२ या वर्षांत २ लाख ३९ हजार ७३४ बाह्यरुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी २८ हजार ४५३ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. १२ हजार ७२१ एवढ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ मध्ये १०८ ट्रॉमा केअर सेंटर्सचा  बृहत आराखडा तयार केला. त्यापैकी ६३ सेंटर्स कार्यान्वित होऊ शकली. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, राज्यात २१ जिल्हा रुग्णालये, २६ उपजिल्हा रुग्णालये, ४७ ग्रामीण रुग्णालये, १३ अन्य रुग्णालये आणि एक स्वतंत्र ट्राॅमा केअर युनिट, अशा एकूण १०८ ठिकाणी ट्राॅमा केअर सेंटरला मंजुरी देण्यात आली. उर्वरित ४५ पैकी १५ सेंटरचे बांधकाम सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तर ३० सेंटर्स अजूनही आराखडे तयार करण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्यासाठी जागाही उपलब्ध झालेल्या नाहीत.

पदे वाढविण्याचा प्रस्ताव
प्रत्येक ट्राॅमा केअर सेंटरमध्ये ३३ पदांना मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आहे. त्यात दोन अस्थी व्यंगोपचार तज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी, दोन जनरल सर्जन, १३ परिसेविका आणि १० अतांत्रिक पदांचा समावेश आहे.

ठाण्यात सरकारी ट्रॉमा सेंटर बंद
 दोन वर्षांपासून ठाणे जिल्हा सरकारी ट्रामा केअर सेंटर बंद आहे. उल्हासनगर येथील केंद्र कार्यान्वित असून, मुरबाडमध्ये सुसज्ज असे उपचार केंद्र सुरू होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद (घोडबंदर रोड), मुंबई-पुणे-बंगळुरू, मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदनगर असे चार राष्ट्रीय महामार्ग जातात. भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासून सरकारी सेंटर बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या अपघातग्रस्तांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविले जाते, तर अपघातग्रस्तांच्या डोक्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्यास मुंबईतील सर जेजे किंवा ठाण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले जाते. 

नवी मुंबईत १० बेडचे ट्रॉमा सेंटर
नवी मुंबईतून सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोड, ठाणे बेलापूर राेडसह अनेक प्रमुख रस्ते असून, या परिसरात वारंवार अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात १० बेडचे ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये पाच आयसीयू युनिट, सीटी स्कॅन सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे अपघातग्रस्तांवर तत्काळ उपचार मिळवून देणे शक्य होत आहे. मनपाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सुपरस्पेशालिटी उपचाराची सुविधा नाही. अशा उपचाराची आवश्यकता भासल्यास शहरातील रुग्णांना मनपाच्या कोट्यातून दिल्या जातात. 

यांची असते नेमणूक
प्रत्येक ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १५ पदे आहेत. त्यात एक अस्थी व्यंगोपचार तज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी, तीन परिसेविका आणि सात अतांत्रिक पदांचा समावेश आहे. 

सुविधा
सर्व ट्रॉमा केअर युनिट सेंटरमध्ये शल्यचिकित्सक,  रुग्णांच्या अवस्थेचे मूल्यांकन करून त्यांना वैद्यकीय व शस्त्रक्रिया सुविधा देतात. 
 

Web Title: 45 trauma care centers left in the state only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.