महादेव ॲपमुळे जीएसटीला ३० हजार कोटींचा फटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:31 AM2024-02-06T11:31:18+5:302024-02-06T11:31:39+5:30

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी महादेव ॲप भारतात सुरू केले होते

30 thousand crore hit to GST due to Mahadev app? | महादेव ॲपमुळे जीएसटीला ३० हजार कोटींचा फटका?

महादेव ॲपमुळे जीएसटीला ३० हजार कोटींचा फटका?

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सट्टेबाजीच्या माध्यमातून भारतातून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणारे महादेव ॲप आता केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या दक्षता पथकाच्या रडारवर आले असून कंपनीने तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा कर थकविल्याचा संशय या पथकाला आहे आणि त्या अनुषंगाने आता या पथकाने या गैरप्रकाराची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला भारतात व्यवहार करण्याकरिता कंपनीने नोंद केली होती. मात्र, जीएसटी क्रमांकच काढला नसल्याचेही आतापर्यंतच्या तपासात उजेडात आले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी महादेव ॲप भारतात सुरू केले होते. नंतर हे दोघेही दुबईत स्थायिक झाले व तिथे हीच कंपनी सुरू केली. 

 क्रमांक नसल्याने...
कंपनीच्या भारतातील व्यवहाराकरिता भारतामध्ये डीलर नेमले होते. ७० टक्के त्यांचा व ३० टक्के डीलरचा नफा या पद्धतीने व्यवहाराचा सौदा ठरला होता. या व्यवहाराकरिता मूळ कंपनीखेरीज आणखी काही कंपन्यादेखील भारतात स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या कंपन्यांचादेखील जीएसटी क्रमांक काढला नसल्यामुळे सुमारे ३० हजार कोटी रुपयांपर्यंत कर चुकवला गेल्याचा जीएसटी विभागाचा अंदाज असल्याचे समजते. महादेव ॲपच्या विरोधात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी कंपनीच्या विरोधात ईडीदेखील तपास करत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी कंपनीची ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, प्रवर्तकांनी ५ हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठविल्याचा संशय आहे.

Web Title: 30 thousand crore hit to GST due to Mahadev app?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.