BMC महापौरपदासाठी भाजपाकडून ३ नावे शर्यतीत, शिंदेसेनेची रणनीती काय?; उद्धवसेनाही उमेदवार उतरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:53 IST2026-02-06T13:52:42+5:302026-02-06T13:53:12+5:30
महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार उतरवले जातील.

BMC महापौरपदासाठी भाजपाकडून ३ नावे शर्यतीत, शिंदेसेनेची रणनीती काय?; उद्धवसेनाही उमेदवार उतरवणार
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थाने मुंबईतील सत्ता समीकरणाला वेग आला आहे. मुंबईत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री बैठक होईल. या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल. भाजपाकडून महापौरपदासाठी ३ नावे शर्यतीत आहेत. त्यात राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर या नावांचा समावेश आहे.
उपमहापौरपद शिंदेसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यासाठी २ नावांची चर्चा आहे. त्यात तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव यांची नावे आहेत. तर स्थायी समिती अध्यक्षपद भाजपाजवळच राहील. मुंबईत महापौरपद सर्वसामान्य प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. उद्धवसेनेकडून तशी रणनीती आखण्यात येत आहे. ७ फेब्रुवारीला महापौरपदासाठी अर्ज भरायला सुरुवात होईल. महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार उतरवले जातील.
मुंबईत महायुतीला ११८ जागा मिळाल्या आहेत. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा आकडा ११९ इतका झाला आहे. त्याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ नगरसेवकही महायुतीला पाठिंबा देतील असं बोलले जाते. त्यामुळे सध्या महायुतीकडे १२२ चे संख्याबळ आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे ६५, राज ठाकरेंच्या मनसेकडे ६, एमआयएमचे ८, सपा २, काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत.
स्थायी समितीत संख्याबळ कसं असणार?
मुंबई महापालिकेच्या निकालानुसार स्थायी समितीत विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे १३-१३ सदस्य असतील. परंतु स्थायी समितीत आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदेसेना आणि भाजपाने संख्याबळ वाढवण्यावर भर दिला आहे. यातूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदस्य महायुतीला पाठिंबा देणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवकही महायुतीला पाठिंबा देणार आहे. त्याशिवाय मनसेच्या पाठिंब्यासाठीही सत्ताधारी पक्षाकडून हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते.