२७५ गावपाड्यांत पाणीटंचाई

By Admin | Updated: June 1, 2015 22:46 IST2015-06-01T22:46:43+5:302015-06-01T22:46:43+5:30

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २७५ गावपाड्यांच्या ग्रामस्थांना सध्या सुमारे ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

275 Water shortage in village panchayat | २७५ गावपाड्यांत पाणीटंचाई

२७५ गावपाड्यांत पाणीटंचाई

सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे, पालघर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २७५ गावपाड्यांच्या ग्रामस्थांना सध्या सुमारे ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड देत असलेले गावपाडे होरपळून निघत आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी, तो कमी पडत असल्यामुळे बहुतांशी गावपाड्यांमधील ग्रामस्थांना जंगलातील विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ठाणे जिल्ह्यातील १२८ तर पालघर जिल्ह्यातील १४७ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ हे चार तालुके वगळता उर्वरित शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांतील ग्रामस्थ पाणीटंचाईला तोंड देत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी वसई, पालघर, तलासरी आणि डहाणू या चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाई नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाद्वारे केला जात आहे. उर्वरित जव्हार तालुक्यातील १० गावे व ११ पाडे टंचाईग्रस्त आहेत. त्यांना चार टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय, विक्रमगड तालुक्यात २९ गावपाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मोखाडा तालुक्यातील ७७ गावपाड्यांमध्ये टंचाई आहे. यामध्ये ३० गावांसह ४७ पाडे आहेत. या गावपाड्यांना सर्वाधिक १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याप्रमाणेच वाडा तालुक्यामध्ये २० गावपाडे टंचाईग्रस्त आहेत. यामध्ये पाच गावांसह १५ पाडे असून त्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Web Title: 275 Water shortage in village panchayat