'बेस्ट'ने स्वतःच्या पायावर उभे राहावे : मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:07 IST2025-10-29T13:07:28+5:302025-10-29T13:07:46+5:30
नव्या १५७ इलेक्ट्रिक एसी बस ताफ्यात दाखल

'बेस्ट'ने स्वतःच्या पायावर उभे राहावे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा ही फायद्यात नसते. बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेने आतापर्यंत तीन हजार ४०० कोटींची आर्थिक मदत केली आहे. मात्र, यापुढे बेस्ट उपक्रमाने यापुढे केवळ तिकिटाच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढवावेत. उत्पन्न वाढीसाठी नवीन नवीन संधी उपलब्ध असून त्यावर बेस्टने अधिक चांगला अभ्यास करून योग्य नियोजनाद्वारे कृती करावी. त्यामुळे 'बेस्ट' स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहू शकेल, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'बेस्ट'ला केली आहे.
'बेस्ट'च्या कुलाबा येथील मुख्य कार्यालयात १५७ इलेक्ट्रिक एसी बसगाड्यांचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे असताना 'बेस्ट'ला पाच हजार इलेक्ट्रिक बसगाड्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून तसेच मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी 'बेस्ट' मध्ये इलेक्ट्रिक पर्यावरणपूरक बसगाड्या दाखल करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने यापुढेही मदतीचा हात द्यावा : शिंदे
महाविकास आघाडीची सत्ता असताना 'बेस्ट' डब्यात जाणार होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर 'बेस्ट'ला नवसंजीवनी मिळाली. पालिकेने 'बेस्ट'ला वेळोवेळी आर्थिक मदत केली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी एक हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. या पुढेही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 'बेस्ट'कडे विशेष लक्ष द्यावे आणि आर्थिक मदत करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
गर्दीच्या बस मार्गांवर १२ मीटर लांब इलेक्ट्रिक एसी बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा काळ कमी होईल.
बसमार्गांची मेट्रोला जोडणी
नवीन बसगाड्या महापालिकेच्या २१ प्रभागांमधून चालविण्यात येणार आहेत. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, कुर्ला पूर्व व पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली पश्चिम, आणि बोरीवली पश्चिम या उपनगरी रेल्वे स्थानकांना बससेवेने जोडण्यात येणार आहे. याशिवाय हे बस मार्ग मेट्रो २ ए, मेट्रो ७, अॅक्वा लाइन ३ आणि मेट्रो १ यांच्याशीही जोडण्यात येतील.