Join us  

Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:58 AM

Pawankhind Marathi Movie Review : शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात  मांडली आहे. कसा आहे हा चित्रपट?

कलाकार -मृणाल कुलकर्णी,चिन्मय मांडलेकर,अजय पूरकर,अंकित मोहन, हरीश दुधाडे,प्राजक्ता माळीदिग्दर्शक - दिग्पाल लांजेकरवेळ - 2 तास 33 मिनिटे

रेटिंग: 3.5

Pawankhind Movie Review : आजही महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी कानावर पडल्या की, अंगावर रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी आपण पाठ्यपुस्तकात वाचल्या आहेत, अनेक नाटकांतून, चित्रपटांतून, मालिकांमधून अनुभवल्या आहेत. पण तरीही प्रत्येकवेळी शिवराय शिवभक्तांना आकर्षित करतात. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन चित्रटानंतर ‘पावनखिंड’ हा नवा सिनेमा शिवरायांच्या अभूपूर्व पराक्रमाची गाथा सांगणारा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात  मांडली आहे. कसा आहे हा चित्रपट?

‘पावनखिंड’ची कथा आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. बाजीप्रभू, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पडद्यावर साकारणाऱ्या या चित्रपटाची सुरूवात होते ती महाराजांच्या एका दृश्यापासून. राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात आणि या पवित्र नदीला वंदन करतात. कारण याच नदीच्या पाण्यात बांदल सेनेनं रक्त सांडलं होतंं. महाराज शंभूराजांना सांगू लागतात आणि महाराजांच्या स्मृतीतून चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांसमोर उभं राहतं. पाठोपाठ बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्यासोबत प्राणप्रणाने लढणारे रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या शिलेदारांची ओळखही आपल्याला होते.

पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडलेला असताना हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना, ही योजना यशस्वी व्हावी आणि शत्रू बेसावध होऊन महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद, महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल आणि बांदल सेना, तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू देशपांडे या सर्वांच्या पराक्रमांचे जिवंत स्वरूप म्हणजेच पावनखिंड हा चित्रपट.

हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अनेक संवाद अंगावर काटा आणतात. दिग्पालने संपूर्ण घटनाक्रम अगदी समर्पकपणे लिहिता आहे. वेळोवेळी इतिहासाचे दाखलेही दिले आहे. प्रत्येक भूमिका त्याने अतिशय बारकाईने लिहिली आहे, हे चित्रपट पाहताना वेळोवेळी जाणवते. पुवार्धात पटकथा आणि संकलन काहीसं अपुरं वाटतं. पण उत्तरार्धात मात्र या सगळ्या त्रुटी भरून निघतात. युद्धाचे अनेक प्रसंग अंगावर शहारे आणतात. तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा आणखी चांगला होऊ शकला असता. पण कलाकारांचा दमदार अभिनय, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, युद्धाचे प्रसंग पाहून त्याकडे आपसूक दुर्लक्ष होतं. विशेषत: चित्रपटातील क्लोजअप शॉट्स भुरळ घालतात.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल म्हणाल, तर पावनखिंडमध्ये प्रत्येक कलाकाराने अगदी जीव तोडून काम केलं आहे. चिन्मय मांडलेकरनी साकारलेली महाराजांची भूमिका, अजय पूरकर याने साकारलेला बाजीप्रभू अफलातून आहे. समीर धर्माधिकारीने साकारलेली सिद्दी जौहरची भूमिका पाहताना  मंत्रमुग्ध व्हायला होतं. अंकित मोहन, हरीश दुधाडे, आस्ताद काळे, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, क्षिती जोग, उज्वला जोग यांच्या भूमिकाही मनावर छाप सोडतात. कलाकारांनी आपापल्या भूमिका साकारल्या नाहीयेत तर ते या भूमिका खरोखर जगले आहेत, याची जाणीव पदोपदी होते.

एकंदर काय तर दिग्दर्शक आणि कलाकारांची मेहनत पडद्यावर दिसते.  एका अभूतपूर्व इतिहासाचा अनुभव  घेण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन एकदा तरी बघायलाच हवा.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरदिग्पाल लांजेकरमृणाल कुलकर्णीप्राजक्ता माळीवैभव मांगले