Join us

Majhi Tujhi Reshimgath : सगळे प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले आता मराठी मालिका सुद्धा..., नेहाला गुजराती बोलताना पाहून संतापले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:03 IST

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रार्थना बेहरे  व श्रेयस तळपदेची  रोमॅन्टिक केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. सध्या मात्र प्रेक्षक या मालिकेवर नाराज दिसत आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका.  अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere)  व श्रेयस तळपदेची  (Shreyas Talpade) रोमॅन्टिक केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. सध्या मात्र प्रेक्षक या मालिकेवर नाराज दिसत आहेत. होय, मालिकेत सध्या एक वेगळाच  ट्विस्ट  पाहायला मिळतो आहे आणि ते पाहून प्रेक्षक नाराज आहेत. मध्यंतरी यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि यश व नेहाचा  मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. तर, यश जखमी होतो. या अनपेक्षित ट्विस्टनंतर काही दिवस नेहा मालिकेतून गायब होती. पण आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का बनून. ती सुद्धा गुजराती मुलगी बनून. हे पाहून प्रेक्षक संतापले आहेत.

मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. त्यात  नेहा  गुजराती भाषेमध्ये संवाद साधताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांचा तीळपापड झाला आहे. इतका की, अनेकांनी  ही मालिकाच बंद करण्याची मागणी केली आहे. मराठी मालिकेत गुजराती बोलणं हे अनेक प्रेक्षकांना खटकलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपला राग व्यक्त केला आहे. एका युजरने तर सध्याच्या राजकीय घडामोडींचा नेहाच्या गुजराती बोलण्याचा संबंध जोडला आहे.

 सध्या राज्यातील अनेक मोठमोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहेत. त्यावरुन राज्यात राजकीय वातावरण पेटले आहेत. एका युजरने याचं कनेक्शन मालिकेशी जोडलं आहे.  ‘ही पण गुजरातमध्ये दाखवा आता. सगळे प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले आता मराठी मालिका सुद्धा...,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. मराठी मालिका आहे की गुजराती? अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. बंद करा मालिका.. मराठीचे मारेकरी, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :प्रार्थना बेहरेश्रेयस तळपदेझी मराठीमराठी अभिनेताटेलिव्हिजन