ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - बॉलिवूड कपल मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघे विभक्त होणार असल्याची ब-याच काळापासून फिरत असलेली अफवा आता अखेर खरी ठरली असून मलायका आणि अरबाज या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या दोघांनीही 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या जॉईंट स्टेटमेंमध्ये ते एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मलायकाचे बिझनेसमनशी सूत जुळल्यामुळे वा मीडियात फिरत असलेली इतर कारणे ही आपल्या विभक्त होण्यास कारणीभूत ठरल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला असून कोणत्याही वकिलाकडे गेल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले.
दरम्यान या जॉईंट स्टेटमेंटमध्ये त्यांनी 'चुकीची माहिती पसरवणा-या' त्यांच्या 'तथाकथित मित्रांवर'ही निशाणा साधला आहे. तसेच हे लग्न वाचवण्यासाठी अरबाजचा भाऊ अभिनेता सलमान खानने मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न, अरबाजच्या कुटुंबियांना मलायकाच्या लाईफस्टाईलमुळे असलेला प्रॉब्लेम आहे वा लग्नापासून आपल्याला कोणतेही आर्थिक स्थैय मिळाले नाही, अशी मलायकाने केलेली तक्रार... या सर्व वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत या वृत्तांचा घटस्फोटाशी कोणताही संबंध नसल्याचे अरबाज व मलायकाने स्पष्ट केले आहे.
तसेच ' हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून आम्ही दोघे शांत आहोत याचा कोणीही फायदा घेऊ नये. जेव्हा आम्ही दोघेही तयार असू तेव्हा आम्ही या विषयावर भाष्य करू. आमच्या दोघांसाठीही ही अतिशय कठीण वेळ असून आम्हाला आमची स्पेस द्या' अशी विनंती त्यांनी मीडियाला केली आहे.