दिग्दर्शक आदित्य धरच्या (Aditya Dhar) आगामी सिनेमात अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt)मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या संजय दत्त सिनेमाचं शूटिंग करत आहे. दरम्यान आदित्य धरने पत्नी यामी गौतम (Yami Gautam), मुलगा वेदाविदसह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संजय दत्तही त्यांच्यासोबत होता. यामीने लेकाला छातीशी कवटाळून घेतलं होतं. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
यामी गौतमने पती आदित्य धर आणि मुलगा वेदाविदसह गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं. यावेळी संजय दत्तनेही लक्ष वेधून घेतलं. चिमुकला वेदाविद आईच्या कडेवर दिसत आहे. त्याला कानटोपी घातली असून त्याचा चेहरा मात्र दिसत नाहीए. तर यामीने डोक्यावरुन पांढरी ओढणी घेतली आहे. आदित्यने शाल पांघरली आहे. तर संजय दत्तही कूल लूकमध्ये दिसत आहे. या तिघांचा सुवर्ण मंदिरातील हा फोटो आता व्हायरल होतोय.
यापूर्वी संजय दत्तने पंजाबचे मंत्री कुलदीप धालीवाल यांचीही भेट घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य धरने काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहसोबत सुवर्णमंदिराचं दर्शन घेतलं होतं. रणवीरने त्याचे काही फोटो शेअर केले होते. आदित्य धरच्या सिनेमात रणवीर सिंह आणि संजय दत्त एकत्र काम करत आहेत. यामध्ये आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे देखील आहेत. हा सिनेमा इंडियन इंटेलिजन्स एजंसी 'रॉ' च्या इतिहास पुस्तकांतील काही आश्चर्यकारक घटनांवर आधारित आहे.