ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - बॉलिवूडचा 'दबंग खान' अशी ओळख असणारा सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटातले संवाद, अॅक्शन सीन्स असोत किंवा मग वेगवेगळ्या तारकांबरोबर त्याचे जोडले जाणारे नाव असो, चर्चा होतेच. आत्तापर्यंत अनेक प्रेमप्रकरणं झालेला सलमान लग्न करून नेमका कधी सेटल होणार हा प्रश्न फक्त त्याच्या कुटुंबियांनाच नव्हे तर त्याच्या लाखो चाहत्यांनाही पडला आहे. पण खुद्द सलमानला त्याची फारशी फिकीर नाहीये. नुकत्याच एका मुलाखतीत सलमानने आपण कदाचित आयुष्यभर अविवाहित राहू, असे सांगत सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच आपल्याला राजकारणात किंवा दिग्दर्शनात रस नसल्याचे सांगत आपण अभिनेता म्हणूनच काम करत राहू, असेही त्याने स्पष्ट केले.
या मुलाखतीत सलमानने आपल्या आयुष्याबाबत मनमोकळपणे गप्पा मारल्या असून लहान मुलांच्या कल्याणासाठी काम करण्यात आयुष्य घालवायला आवडेल, असे त्याने सांगितले. 'बीईंग ह्युमन' या संस्थेतर्फे करण्यात येणा-या समाजोपयोगी कामामुळे आपण खुश असल्याचे सांगत मुलांच्या भल्यासाठी काम करता यावे अशा आणखी काही संस्था दत्तक घेण्याचा विचारही त्याने बोलून दाखवला.