Join us
Daily Top 2Weekly Top 5

गावरान आर्चीची सर मॉडर्न जान्हवीला येणार का?

By admin | Updated: November 18, 2016 04:16 IST

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये आर्चीची भुमिकेद्वारे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पण करणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरने सैराट चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये आर्चीच्या भुमिकेद्वारे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची-परशाच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावले. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याड लावले होते.  'सैराट' सुपर-डुपर हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक निर्माते उत्सुक होते.

मात्र, अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने बाजी मारत हे हक्क मिळवले. आता धर्मा प्रोडक्शन आणि झी एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे कथानक बऱ्यापैंकी 'सैराट'सारखेच राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. याच चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

वरुण धवनच्या अपोझिट 'शिद्दत' या सिनेमाव्दारे करण जोहर जान्हवीला लॉन्च करणार असल्याची चर्चा याआधी रंगत होती. मात्र आता 'सैराट'च्या रिमेकमध्ये करण जान्हवीलाच घेण्यास उत्सुक असल्याची माहिती धर्मा प्रॉडक्शनकडून मिळाल्यामुळे गावरान आर्चीची सर करणच्या मॉडर्न आर्चीला येते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.