Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती? कलाकार फोडणार लाखोंच्या सुपाऱ्या! ट्रोलिंगच्या भीतीने सावध पावलेही उचलणार

By संजय घावरे | Updated: April 3, 2024 09:17 IST

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत. काही कलाकारांनी अगोदरच पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले असले तरी तटस्थ असलेले काही कलाकार कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता आहे.

कला आणि राजकारण यांचा थेट संबंध नसला तरी काही कलाकार विविध संघटनांच्या माध्यमांतून राजकीय पक्षांसाठी काम करत आहेत. काही जण मोठी सुपारी देणाऱ्या उमेदवाराचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत, तर काहीजण 'नको ते राजकारण, नको ती सुपारी', म्हणत प्रचारापासून दूर पळत आहेत. काही कलाकारांची मात्र प्रचंड क्रेझ आहे. यात सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, श्रृती मराठे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी आदी अभिनेत्रींसोबतच स्वप्नील जोशी, सुबोध भावे, भरत जाधव, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, प्रसाद ओक, वैभव मांगले, संतोष पवार आदी अभिनेत्यांचा समावेश आहे. मात्र यापैकी काहीजण राजकारण, निवडणूक आणि प्रचारापासून दूर राहणेच पसंत करतात. 

हिंदीतील आघाडीच्या कलाकारांच्या सुपाऱ्या २०-२५ लाख रुपयांपासून सुरू होत असून, काही कलाकार १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमीमध्येही प्रचार करायला तयार होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घोडेबाजार किती तेजीत आहे त्यावर मानधनाची गणिते अवलंबून असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आघाडीच्या काही मराठी कलाकारांच्या सुपारीचा आकडा सात लाख रुपयांपासून सुरू होत असून, काहीजण तीन लाख रुपयांमध्येही तयार होतील असे समजते. छोट्या पडद्यावरील आघाडीच्या कलाकारांना दोन-तीन लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, तर सहाय्यक भूमिकांतील काही कलाकारांना ५०-६० हजार रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे. काहीजण दिवसभरात एक-दोन ठिकाणी हजेरी लावून चांगली कमाई करू शकतात.

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या'मधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील गौरव मोरे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, ओमकार भोजने, नम्रता संभेराव आदींचा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाव वाढणार असला तरी, यापैकी कोणते कलाकार प्रचार करणार आणि कोणते दूर पळणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही कलाकार ठराविक पक्षासाठी काम करत असल्याने ते इतरांसाठी प्रचार करणार नाहीत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिव चित्रपट सेनेत सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचके, राजेश भोसले, योगेश शिरसाट, अलका परब, शेखर फडके, केतन क्षीरसागर, अमोल नाईक, प्रतीक पाटील आदींचा समावेश आहे. 

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठमध्ये प्रिया बेर्डे, मेघा धाडे, तसेच भाजप चित्रपट कामगार आघाडीत वितरक समीर दीक्षित यांच्यासह किशोरी शहाणे, आनंद काळे आदी कलाकार असून, एन. चंद्रा, किशोर कदम, प्रथमेश परब सल्लागार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, सायली संजीव, स्मिता तांबे, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार आदी कलाकार सक्रियपणे कार्य करीत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आदेश बांदेकर हे एक मोठे नाव आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागासाठी विजय पाटकर, असित रेडीज काम करत आहेत.........................कलाकारांना ट्रोलिंगचे भय...एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यास विरोधी पक्षातील उमेदवाराचे कार्यकर्ते सोशल मीडियावर ट्रोल करून हैराण करण्याची भीतीही कलाकारांच्या मनात आहे.

टॅग्स :निवडणूकमहेश मांजरेकर अमृता खानविलकरसायली संजीवप्रिया बेर्डेआदेश बांदेकर