असं म्हणतात काही जणांवर देवाचा हात असतो. रिंगण चित्रपटावर माऊलीचा हात होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक मकरंद माने यांच्या डोक्यात आलेल्या अतिशय छोट्या कल्पनेची त्यांनी एक सुंदर सोपी कथा लिहिली. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि त्याचं आईविना वाढलेलं लेकरू, यांची ही कथा.इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमाची कथा शहरी नाही, प्रेम कथा नाही, चित्रपटात नाच-गाणी नाहीत, त्यामुळे चित्रपटाला निर्माता मिळणं अवघड होतं. पण विठ्ठल पाटील, गणेश फुके, महेश येवले, योगेश निकम अशा मित्रांनी एकत्र येऊन याची निर्मिती करायची ठरवली. अभिजित अब्दे, सुचित्रा साठे, संजय दावरा अश्या तंत्रज्ञ मित्रांनी मानधन न घेता चित्रपट पूर्ण करायचा ठरवला. पंढरपूरात चित्रीकरणाच्या वेळी अनंत अडचणी आल्या. पण म्हणतात ना, ‘ लोग साथ आते गए कारवाँ बनता गया’ तसं झालं. पूर्ण युनिटचं जेवण बनवायची जबाबदारी मकरंदच्या आई वडिलांनी स्वत: घेतली. यापूर्वी देखील, स्वत:चे घर, दागिने गहाण ठेवून चित्रपट केल्याच्या अनेक कथा आहेत, पण मानधन न घेता, श्रमदानाने चित्रपट केल्याचे हे बहुदा पहिले उदाहरण. चित्रपटाला ६३वा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवून रिंगण प्रदर्शनाला सज्ज होता. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांनी चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी घेतली. आणि विविध सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीतून आलेल्या व्यक्तींचा एक सुंदर समूह निर्माण झाला. विठूमाऊलीने या सगळ्यांना रिंगणच्या निमित्ताने एकत्र आणलं आणि आता हा चित्रपट आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
रिंगण पूर्ण होताना
By admin | Updated: June 30, 2017 02:30 IST