Join us  

कपिल आणि सुनीलमध्ये काय झालं होतं नेमकं ? संपुर्ण घटना प्रत्यक्षदर्शीच्या तोंडी

By admin | Published: March 23, 2017 3:59 PM

एका प्रत्यक्षदर्शीने नेमकं त्यादिवशी विमानात काय घडलं होतं सविस्तरपणे सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - गेल्या काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामधील भांडणाची चर्चा सुरु आहे. विमानामध्ये कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला केलेली माराहण आणि शिवीगाळ यासंबंधी सतत चर्चा केली जात आहे. वाद इतका चिघळला आहे की सुनील ग्रोव्हरने कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर अली असगर आणि चंदन प्रभाकरही शो सोडणार असल्याची माहिती आहे. नेमकं त्या दिवशी विमानात घडलं तरी काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एका प्रत्यक्षदर्शीने नेमकं त्यादिवशी विमानात काय घडलं होतं सविस्तरपणे सांगितलं आहे. 
 
(दारुच्या नशेत कपिल शर्माने सुनिल ग्रोवरला चोपलं)
 
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा पुर्णपणे दारुच्या नशेत होता. त्याने व्हिस्कीची पुर्ण बाटली संपवली होती. कपिल दारु पित असताना त्याच्या इतर सहका-यांना विमानातील क्रू मेम्बर्स जेवणं वाढत होते. आपल्या अगोदर बाकीचे जेवत आहेत नेमकी हीच गोष्ट कपिल शर्माला खटकली आणि त्याच्या रागाचा पारा चढला. मी अजून जेवायला सुरु केलं नसताना तुम्ही कसं काय जेवण घेतलंत ? असं कपिल शर्मा वारंवार विचारु लागला. 
 
कपिलच्या या वागण्याने त्याचे सहकारीही घाबरले आणि आपले जेवणाचे ट्रे क्रू मेम्बर्सना परत देण्यास सुरु केलं. यावेळी सुनील ग्रोव्हरने मध्यस्थी करत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर कपिल शर्मा अजून संतापला आणि जागेवरुन उठला. उठल्यावर त्याने पायातला बूट काढून सुनीलच्या दिशेने भिरकावला. यानंतर सुनीलची कॉलर पकडून त्याला कानाखाली मारण्यास सुरुवात केली. यानंतरही सुनीलने कोणतीही प्रतिक्रिया न देता संयम कायम ठेवला होता. 
 
सुनील ग्रोव्हर वारंवार कपिल शर्माला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण तोपर्यंत कपिल शर्माचा आवाज वाढला होता आणि त्याने शिवागीळ करण्यास सुरुवात केली होती. कपिल शर्माचा आवाज इतका वाढला होता की इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना हा सर्व प्रकार ऐकू जात होता. जेव्हा केबिन क्रू ने कपिल शर्माच्या टीमला परिस्थिती हाताळण्याची विनंती करत कपिलला शांत करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी आम्ही घाबरलो असल्याचं सांगत त्यांनी नकार दिला. 
 
यानंतरही कपिलची आरडाओरड सुरुच होती. आपल्या टीमकडे पाहत तो जोरात ओरडला की, 'तुम्हा लोकांना मी बनवलं आहे. सर्वांचं करिअर संपवून टाकेन. तुम्ही टीव्हीवाले काय समजता ? सर्वांना काढून टाकेन'. यावेळी कपिल शर्मा वारंवार सुनील ग्रोव्हरकडे पाहून टोमणे मारत त्याचा अपमान करत होता. 'तू तर निघून गेला होतास ना, मग कशाला परत आलास', असं सारखं विचारत होता. 
 
2014 मध्ये कपिल शर्मासोबत वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हरने कॉमेडी नाईट्समधून काढता पाय घेतला होता. मात्र त्याचा शो फ्लॉप झाल्याने तो परतला होता. 
 
ओरडत असताना कपिल पंजाबी भाषेत वारंवार अपमानस्पद शब्द वापरत होता. शेवटी केबिन क्रू ने कपिलला थांबला नाहीस तर सुरक्षा रक्षकांना बोलवावं लागेल अशी तंबी दिली. यावेळीही कपिल शर्मा वारंवार 'हे लोक स्वत:ला समजतात तरी काय ...माझ्यामुळे यांचं करिअर आहे', असं बोलत होता.