मुंबई : एकतर्फी झालेल्या सामन्यात पश्चिम रेल्वेने पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) संघाचा ३-१ असा धुव्वा उडवत १२व्या गुरु तेग बहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. चर्चगेट येथील हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत रेल्वेची सुरुवात निराशाजनक झाली. पण यानंतर चुका सुधारताना सांघिक खेळाच्या जोरावर त्यांनी दमदार पुनरागमन केले. पीएनबीच्या अर्जुन अन्टीलने २० व्या मिनिटात पहिला गोल करुन संघाला १-० असे आघाडीवर नेले. पीएनबीचा हा अखेरचा गोल ठरला. यानंतर रेल्वेच्या धडाक्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. रेल्वेच्या राजन कांदुलिनाने २९ व्या मिनिटाला गोल करुन संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या रेल्वेने पीएनबीला पुनरागमनाची संधी दिली नाही. ३२ व्या आणि ५३ व्या मिनिटाला रेल्वेच्या अनुकमे मलक सिंग आणि अयप्पाने गोल करुन रेल्वेच्या विजेतेपदावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले.
पश्चिम रेल्वेचे ‘सुवर्ण’ विजेतेपद
By admin | Updated: June 13, 2016 04:13 IST