सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक लेक श्रियाने (Shriya Pilgaonkar) इंडस्ट्रीत तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शाहरुख खानच्या रईस सिनेमातून तिने हिंदी पदार्पण केलं. नंतर ती ओटीटीमध्ये रमली. पण प्रत्येक वेळी तिच्यातली मराठी मुलगी झळकतेच. श्रिया ओटीटीवर जास्त काम करत असल्याने या क्षेत्रात बोल्ड सीन्स, न्यूडिटी काही नवीन नाही. याकडे ती कसं बघते आणि तिने स्वत:वर काही मर्यादा घातल्या आहेत का? यावर नुकतंच श्रियाने उत्तर दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, "ऑफस्क्रीन संस्कार ऑनस्क्रीन संस्कारांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे मला माझ्या ऑफस्क्रीन संस्कारावर विश्वास आहेच. कलाकार म्हणून ऑनस्क्रीन तेच तेच करणं मला शक्य नाही आणि कलाकाराने ते करुही नये. काळानुसार कंटेंट बदलत गेला आहे. मला स्वत:च्या मर्यादा माहित आहेत. पण जर एखाद्या प्रेमकहाणीत मुलगा आणि मुलगी किस करतात तर ते करायला मी 'नाही' म्हणणार नाही. पण तो सीन कसा केला आहे, त्याचा हेतू काय आहे हे मी पाहते. मला स्वत:ला कळतं की कोणती गोष्ट केवळ सेन्सेशनलाइज करायची म्हणून केली आहे आणि कोणती नाही. "
ती पुढे म्हणाली, "न्यूडिटी वगरे सारख्या गोष्टी आहेत ज्या मी कधी करणार नाही. जे करतात त्यांनाही आपण जज करु नये. कारण खूप चांगले सिनेमे आले आहेत ज्यात त्या सीनचीही गरज होती. त्यामुळे गोष्टीमागचा हेतू पाहणं गरजेचं आहे. आईबाबा मला नेहमीच पाठिंबा देतात. तसंच मला गोष्टींचं जजमेंट आहे असा त्यांनाही माझ्यावर विश्वास आहे. आज इंटरनेटवर काहीही घडतंय. फेक व्हिडिओ बनवतात. किती खोटं काय काय दाखवत आहेत. हे आपल्या हातात नाही. काही लोक प्रतिमा मलीन करण्यासाठी असं सगळं करतात."