Prajakta Koli On Nepal Protest: गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. सध्या नेपाळमधील तरुणांनी सरकारविरोधात सुरु केलेल्या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. समाजमाध्यमांवरील बंदी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरकारविरुद्ध वाढता असंतोष यामुळे नेपाळमध्ये जेन झी या संघटनेच्या प्रेरणेने व विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनआंदोलनाचा जोरदार तडाखा बसल्याने नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी आता राजकीय तसेच मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटी मंडळी देखील व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री मनीषा कोईरालानंतर आणखी एका नायिकेने या प्रकरणावर भाष्य करत मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राची लेक आणि नेपाळची सून असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने नेपाळमध्ये घडणाऱ्या या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ताने नेपाळमधील वाढती हिंसा आणि अशांततेमुळं तिची नेपाळ ट्रिप कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याबाबत सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करत नाराजी जाहीर केली. त्यामध्ये तिने म्हटलंय, काल नेपाळमध्ये जे घडलं ते खरोखरच हृदयद्रावक आहे. अशा वेळी कोणताही उत्सव साजरा करणं, किंवा सेलीब्रेशन करणं मला योग्य वाटत नाही. ज्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत.
त्यानंतर पुढे प्राजक्ताने म्हटलंय, "मी तिथे जाऊन सर्वांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होते,पण आता ही योग्य वेळ नाही.आशा आहे की मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटू शकेन."अशा भावना तिने या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहे.
प्राजक्ता कोळी ही ठाण्यातील मराठी कुटुंबात जन्माला आली. युट्यूबर ते अभिनेत्री आणि आता समाजसेविका अशी तिची नव्याने ओळख झाली आहे. आधी ती रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती. नंतर तिने फुलटाईम युट्यूबर म्हणून काम सुरु केलं होतं. प्राजक्ताने पर्यायवरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.याशिवाय प्राजक्ताने काही हिंदी सिनेमा, सीरिजमध्येही काम केलं आहे.