Join us

काजोल पुन्हा कोर्टात! 'द ट्रायल' सीझन २ ची घोषणा, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:31 IST

काजोल तिच्या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा सीझन घेऊन येत आहे.

९० च्या काळापासून ते आतापर्यंत एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या काजोलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काजोलची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून बसते. काजोलचे जगभरात लाखो चाहते आहेत. काजोल तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. ती सतत चर्चेत आहे. या वर्षी काजोल दोन चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यापैकी एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर 'माँ' होता.जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. तर अलिकडेच तिचा 'सरजमीन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता काजोल तिच्या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा सीझन घेऊन येत आहे.

काजोलची 'द ट्रायल-प्यार, कानून, धोका या सीरिजच्या पाहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ हॉटस्टारकडून काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती 'द ट्रायल' सीझन २ ची घोषणा करताना दिसतेय. या सीझनमध्ये काजोल पुन्हा एकदा नोयोनिका सेनगुप्ताच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नव्या सीझनमध्ये कोर्टरुम ड्रामा आणि भावनिक गुंतागुंत यांचं मिश्रण पाहायला मिळेल.

'द ट्रायल' सीझन २ हे येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्वीचा जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनची कथा अशी होती की, काजोलनं साकारलेली नयोनिका ही वकील असते पण घर सांभाळण्यासाठी ती काम सोडते. नयोनिकाच्या आयुष्यात मोठी संकट येतं, जेव्हा तिच्या पतीवर लोकांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात येतो. पती तुरुंगात गेल्यावर तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना वकिलीचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा लागतो.  त्यानंतर नयोनिका एका लॉ फर्ममध्ये काम करायला सुरुवात करते. ' द ट्रायल' या वेब सीरिजची कथा रॉबर्ट किंग आणि मिशेल किंग यांच्या "द गुड वाईफ" या प्रसिद्ध अमेरिकन शोवरून प्रेरित आहे.

 

टॅग्स :काजोल