Join us  

इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:01 PM

Sonakshi sinha: हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मानधनाविषयी बरेच खुलासे केले आहेत.

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेली सोनाक्षी (sonakshi sinha) नुकतीच 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये झळकली. या सीरिजमध्ये तिने केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. सोनाक्षीने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र, असं असूनही आजही इंडस्ट्रीत तिच्यासोबत मानधनाच्या बाबतीत भेदभाव केला जातो, असं तिने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मानधनातील तफावतीबाबत भाष्य केलं आहे.

'हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला मानधनाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलत असताना तिने आजही मला मानधनासाठी भांडावं लागलं, असं ती म्हणाली.

"सध्या मी माझ्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या त्या भूमिका मी आतापर्यंत केल्या आहेत. मी साकारलेली प्रत्येक भूमिका इतरांपेक्षा वेगळी असल्याचा मला नक्कीच आनंद आहे. मात्र, मी माझ्या करिअरच्या चांगल्या टप्प्यात असूनही मला पैशांसाठी अजूनही भांडावं लागतं", असं सोनाक्षी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्यासाठी हे अजिबात सोपं नाहीये आणि काही वेळा मला ते पटतही नाही. ज्यावेळी चित्रपट निर्माते तुमच्याशी संपर्क साधतात त्यावेळी त्यांना तुमच्या अपेक्षांची पूर्ण कल्पना असते. पण जेव्हा पैशांचा प्रश्न येतो त्यावेळी प्रत्येक अभिनेत्रीला तिची फी कमी करावी, असं प्रत्येकाला वाटतं. पण दरवेळी अभिनेत्रींसोबतच हे का होत? हे मला समजत नाही. मला एक महिला म्हणून कायम ही लढाई लढावी लागते. सध्या महिला अनेक प्रकारच्या लढाई लढत आहेत आणि मानधनातील तफावत ही यातीलच एक लढाई आहे".

दरम्यान, हिरामंडी ही सीरिज १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जवळपास १९० देशांमध्ये ती रिलीज झाली असून ८ भागांची ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, आदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख  आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकत आहेत. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीसिनेमावेबसीरिजबॉलिवूड