भयपट (Horror) चित्रपट आणि सीरिजच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग आहे. काही लोकांना भीतीदायक आणि रोमांचक अनुभव घेणे आवडते. रक्तरंजित दृश्यं नाहीतर थरार, रहस्य आणि भीतीने भारलेली अशी कलाकृती हवी असते जी अंगावर शहारे आणेल. असे प्रेक्षक नेहमी नवनवीन संकल्पना, वेगळ्या पद्धतीने मांडलेली कथा आणि हटके मांडणी असलेल्या कलाकृतींची वाट पाहत असतात. सध्या अशीच एक सीरिज चर्चेत आहे. विशेष म्हणजे या हिंदी सीरिजमध्ये दोन मराठमोळ्या अभिनत्री झळकल्यात. प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांची 'अंधेरा' ही थरारक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही सीरिज नक्की कधी आणि कुठे पाहता येणार, याबाबत जाणून घेऊया.
'अंधेरा' ही नवी हॉरर सीरिज फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसनं तयार केलेली आहे. या सीरिजमध्ये प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांच्यासह करणवीर मल्होत्रा आणि सुरवीन चावला हे लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. या सीरिजचं पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीच्या या नव्या 'अंधेरा' सीरिजमध्ये एकूण ८ भाग असणार आहेत. प्रत्येक भागात वेगळी उत्कंठा आणि ट्विस्ट पाहायला मिळतील. ही सीरिज गौरव देसाई, राघव दार, चिंतन सारडा आणि करण अंशुमन यांनी लिहिली आहे. तर राघव दार यांनी दिग्दर्शित केली आहे. ही सीरिज येत्या १४ ऑगस्टपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) स्ट्रीम होणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रेक्षकांना भयपट आणि गूढतेचा नवा अनुभव मिळणार आहे.