Join us  

Vishwas Patil: “धर्मवीरच! राष्ट्रवादीचे निष्ठावंत अमोल कोल्हेंनी सीरियलसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ वापरलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:06 PM

Vishwas Patil: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते, असे सांगत विश्वास पाटील यांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले आहेत.

Vishwas Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमताना दिसत नाही. यावरून विविध स्तरांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादात आता लेखक विश्वास पाटील यांनी उडी घेतली असून, यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावर भाष्य करताना विश्वास पाटील यांनी  राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सीरियलसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ वापरले, असे म्हटले आहे. 

विश्वास पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये विश्वास पाटील म्हणतात की, संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा  महाराष्ट्र गेली १०५ वर्षे ओळखतो आहे ! कागदपत्रे साक्ष देतात!! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी  वापरले इतकेच. अस्सल कागदपत्रे सांगतात  की , गेली १०५ वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना ‘धर्मवीर’ या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे, असे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. 

राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे

आज-काल  विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते, असे सांगत यापूर्वी लिहिण्यात आलेल्या अनेक नाटकांमध्ये, पोवाड्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख अनेकदा ‘धर्मवीर’ करण्यात आल्याचे विश्वास पाटील यांनी उदाहरणांसह फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असाच करत आला आहे. ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा ‘धर्मभास्कर’ असा केला होता. अन्यथा ‘स्वराज्यरक्षक’ हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या  उच्चांकसाठी  राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला  आहे. त्या  शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही, असे विश्वास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, विश्वास पाटील यांच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी इतिहासाचे अनेक दाखले देखील दिलेले आहेत. तत्पूर्वी, अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते, असे म्हटले होते. यावर आता विश्वास पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून उत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :विश्वास पाटील डॉ अमोल कोल्हेटेलिव्हिजनस्वराज्य रक्षक संभाजी