ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनावर अभिनेत्री हेमामालिनी यांनी दु:ख व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण विनोद खन्नामुळे राजकारणात आल्याची कबुली दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, विनोद खन्ना माझे मित्रच नाही तर चागंले मार्गदर्शकही होते. 70 च्या दशकात विनोद खन्ना आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. 21 एप्रिल 2017 रोजी रिलीज झालेला "एक थी राणी ऐसी भी" हा या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला. हेमामालिनी आणि विनोद खन्ना यांनी हिमालय पुत्र, मार्ग, राजपूत, कुदरत, दी बर्नींग ट्रेन, कुंवारा बाप, रिहाई, मीरा, हाथ की सफाई आणि लेकिन सारख्या चित्रपटात काम केले आहे. आज सकाळी दीर्घ आजाराने विनोद खन्ना यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं आहे. वरळी येथील वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, सुभाष घई यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज स्मशानभूमीत उपस्थित होते. सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अक्षय कुमार, वरुण धवन, करन जोहर, सिधार्थ मल्होत्रा, यामी गौतम आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्याला अतीव दुःख झाल्याची भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. विनोद खन्ना यांनी आपल्या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. यशस्वी नायक ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. रुपेरी पडद्यावर नाव, प्रसिद्धी यश कमावल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणातही त्यांनी तितकेच यश मिळवले. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले. काही दिवसांपूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण झाले होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते.
विनोद खन्नांमुळे मी राजकारणात - हेमामालिनी
By admin | Updated: April 27, 2017 19:26 IST