Join us

VIDEO : शाहरुख-आलियाच्या 'डिअर जिंदगी'चा टीझर रिलीज

By admin | Updated: October 19, 2016 15:38 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि आलिया भट्टचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि आलिया भट्टचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये दोघंही हटके लूकमध्ये दिसत आहेत. टीझरमध्ये शाहरुख आणि आलिया सायकलवरुन फिरताना, मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. याआधी सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर काही वेळातच शाहरुख-आलियाच्या चाहत्यांनी ट्विटरवर याचा ट्रेंडदेखील सुरू केला. 
 
'डिअर जिंदगी' सिनेमामध्ये शाहरुख पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांना आलियाने पूर्णविराम दिला आहे. 'शाहरुख खानची 'डियर जिंदगी'मध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शाहरुखविना हा सिनेमा काहीच नाही. त्याला या सिनेमातून हटवले तर सिनेमाला काही अर्थच उरणार नाही', अशी प्रतिक्रिया आलियाने दिली आहे. तसेच सिनेमाची कहाणी साधी, सोपी आणि काहीशी हटके असल्याचेही तिने सांगितले आहे. 
 

'इंग्लिश विंग्लिश' या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन करणा-या गौरी शिंदेनंच या सिनेमाची कहाणी लिहिली आहे, तसेच दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये 'डिअर जिंदगी' बाबतची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. जेव्हापासून या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. शाहरुख आणि आलियाची सिनेमामध्ये नेमकी कशी पद्धतीची भूमिका असेल?, मोठ्या पडद्यावर हे दोघे रोमान्स करताना दिसणार आहेत का?, हे आणि असे अनेक प्रश्न सध्या सिनेरसिकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला 25 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, कारण 25 नोव्हेंबरला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.