ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा आगामी सिनेमा "सिमरन"चं पहिलं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हंसल मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, सिनेमाच्या पहिल्या टीझरमध्ये कोणतेही संवाद ऐकण्यास मिळणार नाहीत. एक मिनिटाच्या या टीझरमध्ये कंगना वेगवेगळ्या अंदाजात भरपूर मजा-मस्ती करताना दिसत आहे. "सिमरन"मध्ये कंगना एक "हाऊसकीपर" महिलेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
कंगनाचा हा सिनेमा 15 सप्टेंबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमात कंगना एका गुजराती मुलीची भूमिका साकारत आहे, जिचे नाव प्रफुल्ल पटेल आहे. पण दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आतापर्यंत सिनेमाच्या कहाणीसंदर्भात कोणताही खुलासा केलेल नाही.
कंगनानं "सिमरन" सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं असून सध्या तिनं "झांसी की रानी लक्ष्मीबाई" यांच्यावर आधारित बनवण्यात येणा-या ड्रीम प्रोजेक्ट "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी"वर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनानं "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी"चं 20 फुटांचं पोस्टर बनारसमधील गंगा घाटावर लॉन्च केले होते.