Join us  

'हृतिक रोशन शेवटचा स्टार' विकी कौशलने मांडलं मत, म्हणाला, 'अमिताभ-राजेश खन्ना यांच्यापेक्षा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:54 PM

विकी कौशलने मांडलं परखड मत, सध्याच्या पिढीसाठी स्टारडम जपणं खूप आव्हानात्मक

विकी कौशल (Vicky Kaushal) बॉलवूडमधला दमदार अभिनेत आहे. 'मसान', 'उरी' सिनेमातून त्याने आपले टॅलेंट सिद्ध केले. लवकरच तो 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. विकीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. मात्र खरं स्टारडम एन्जॉय करणारा हृतिक रोशन (Hrithik Roshan)  शेवटचा स्टार असल्याचं त्याने म्हटलं आहे. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन , राजेश खन्ना आणि शाहरुख खान यांच्याबाबतीतही तो बोलला आहे.

विकी म्हणाला, " मी अगदी स्पष्टपणे सांगतो की स्टारडम यावर अवलंबून आहे की किती लोक ट्रेलर, गाणी, कूल पोस्टर या गोष्टी न बघता सिनेमा बघायला थिएटरमध्ये आले आहेत. हे लोक केवळ तुम्हाला बघायला आलेले असतात. हाच स्टारडमचा खरा अर्थ आहे. आणि खरं सांगायचं तर आजपर्यंत माझ्यासोबत असं झालेलं नाही. मला अजून स्टारडम कमवायचं आहे."

तो पुढे म्हणाला, "मला वाटतं की क्लासिक स्टारडमची वेगवेगळ्या गोष्टींनी जागा घेतली आहे. दिलीप कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी अनुभवलेलं स्टारडम हे शाहरुख खानपेक्षा खूप वेगळं होतं. हृतिक रोशन हा शेवटचा अभिनेता आहे ज्याचं स्टारडम मी पाहिलं. सध्या प्रत्येक आठवड्यात एक स्टार जन्माला येतो आणि काही आठवड्यांनंतर त्याला कोणीच विचारत नाही. या पिढीसाठी स्टारडम जपून ठेवणं खूप आव्हानात्मक आहे."

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' सिनेमा चांगला चालला. यामध्ये त्याच्या 'छावा' सिनेमाची जोरदार उत्सुकता आहे. यामध्ये रश्मिका मंदाना झळकणार आहे. याशिवाय विकी संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' मध्येही दिसणार आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भटही आहेत.

टॅग्स :विकी कौशलहृतिक रोशनबॉलिवूडसिनेमा