Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोज कुमार यांचा पाकिस्तानात झालेला जन्म, इंडस्ट्रीत येण्यासाठी नाव बदललं अन्...; वाचा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:05 IST

Manoj Kumar Died: भारत कुमार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या मनोज कुमार यांनी इंडस्ट्रीत येण्याआधी त्यांच्य मूळ नावात बदल केला होता.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कित्येक दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. अनेक देशभक्तीपर सिनेमांत त्यांनी काम केलं होतं. त्यामुळेच त्यांना भारत कुमार या नावानेही ओळखलं जात होतं. पण, भारत कुमार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या मनोज कुमार यांनी इंडस्ट्रीत येण्याआधी त्यांच्य मूळ नावात बदल केला होता. 

मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता. स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्याने मनोज कुमार यांचे कुटुंबीय भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा मनोज कुमार १० वर्षांचे होते. त्यांचं खरं नाव हरिकृष्ण गोस्वामी असं होतं. दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. ते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. म्हणूनच इंडस्ट्रीत येताना त्यांनी स्वत:चं नाव बदलून मनोज कुमार असं केलं. 

१९५७ साली फॅशन सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं होतं. पण, त्यांना खरी प्रसिद्धी १९६० साली प्रदर्शित झालेल्या कांच की गुड़िया या सिनेमामुळे मिळाली होती. या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी', 'हिमालय की गोद में', 'दो बदन', 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम', 'रोटी कपडा और मकान', 'क्रांती' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. त्यांना कलाविश्वातील कारकीर्दीसाठी १९९२ साली पद्मश्री आणि २०१५ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. 

टॅग्स :मनोज कुमारसेलिब्रिटीमृत्यूबॉलिवूड