यंदाच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताने खूपच चांगली कामगिरी केली. त्यामुळे क्रिकेटवेडा असणारा भारत देश सध्या आॅलिम्पिकप्रेमी झाला असल्याचे दिसून येतेय. आॅलिम्पिकची चर्चा आॅफिसेस, गल्लीबोळात तर सुरू होतीच; पण त्याचसोबत सोशल मीडियावरही या खेळाची चांगलीच चर्चा रंगली होती. भारताचा स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेटच्या मैदानावर जितकी चांगली बॅटिंग करीत असे, तितकीच चांगली बॅटिंग सध्या तो सोशल मीडियावर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आॅलिम्पिक काळात तर त्याच्याकडून सोशल मीडियावर चौकार-षटकारांचा पाऊस सुरू होता. त्याच्या या ट्विट्सची संपूर्ण देशाने भन्नाट मजा लुटली. अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेकांनी त्याच्या ट्विटला भरभरून दाद दिली.आॅलिम्पिकचा सोशल मीडियावर श्रीगणेशा लेखिका शोभा डे यांच्या ट्विटपासून झाला. शोभा डे यांनी आॅलिम्पिक खेळाडूंवर निशाणा साधत एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘रिओ जाओ, सेल्फी लो और खाली हात लौट आओ...’ त्यांच्या या ट्विटवर अनेक नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. पण, काहीच दिवसांमध्ये साक्षी मलिकने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले आणि संपूर्ण जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. साक्षीला मिळालेल्या या विजयानंतर मैदानात षटकार ठोकणाऱ्या वीरेंद्र सेहवागनेदेखील सोशल मीडियावर आपल्या स्टाइलने शोभा डे यांना उत्तर दिले. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘साक्षी तुम्हारे गले में मेडल बहुत ‘शोभा’ दे रहा है...’ सेहवागच्या या उत्तराला जबरदस्त लाइक्स मिळाले होते.
सेहवाग या ट्विटसाठी चर्चेत असतानाच दीपा कर्माकर जिम्नॅस्टिक्समध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली, त्या वेळी सेहवागने त्याच्या खास शैलीत ट्विट करून दीपा कर्माकरची स्तुती केली. सेहवागने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘थँक्यू दीपा कर्माकर... ज्या देशात जिम्नॅस्टिक्ससारख्या खेळासाठी मूलभूत सुविधाही नाहीत, त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तू देशाला मध्यरात्री एकत्र आणलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे.’ या ट्विटमधून त्याने अप्रत्यक्षरीत्या शासनाला टोमणा मारला होता. आपल्या देशात क्रिकेट या खेळाचे करोडोंनी चाहते आहेत; पण यंदा पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्यामुळे आॅलिम्पिकचा क्रीडा सोहळाही लाखो-करोडो भारतीयांनी आवडीने पाहिला.
या यशामुळे संपूर्ण देशात जल्लोष सुरू असतानाच ब्रिटिश पत्रकार पीरस मॉर्गनने एक ट्विट केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘१२० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाने आॅलिम्पिकमध्ये केवळ दोन पदके मिळवली, तरी ते किती मोठा जल्लोष करीत आहेत? हे दुर्दैव आहे.’ त्याच्या या ट्विटला सेहवागने खूपच चांगले उत्तर दिले. त्याने यावर उत्तर देताना म्हटले की, ‘इंग्लंड हा देश क्रिकेटचा जन्मदाता आहे; पण या देशाने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. तरीही हा देश अजूनही क्रिकेट खेळतोय हे दुर्दैवी नाही का?’ सेहवागने दिलेल्या या उत्तरामुळे भारतीयांना प्रचंड आनंद झाला; पण सेहवागच्या या उत्तरावर मॉर्गनने आणखी एक ट्विट केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘केविन पीटरसन अजून खेळत असता, तर इंग्लंडने वर्ल्डकप नक्कीच जिंकला असता. तसेच, आम्ही टी-२०चा वर्ल्डकप जिंकला आहे आणि त्या वेळी पीटरसनला ‘सामनावीर’ घोषितही करण्यात आले होते.’ यावर सेहवाग कसला शांत बसतोय.
त्याने मॉर्गनला पुन्हा उत्तर दिले. तो म्हणाला की, ‘पीटरसन अतिशय महान खेळाडू आहे, यात कोणतीच शंका नाही. मात्र, तो इंग्लंडचा नाही, तर दक्षिण आफ्रिकन वंशाचा आहे. विशेष म्हणजे, तुमच्या या तर्कानुसार इंग्लंडने २००७मध्येच विश्वचषक जिंकणे गरजेचे होते. आम्ही आमचा आनंद साजरा करतोय यात तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का,’ असा थेट प्रश्नदेखील सेहवागने विचारला होता. सेहवागचा हा टिवटिवचा सिलसिला सुरू असतानाच सोशल मीडियावर कांस्यपदकविजेती साक्षी मलिके हिने सेहवागला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सेहवागने इथेही हटके स्टाइलने साक्षीला उत्तर दिले. त्याने ट्विट केले, ‘मी तुला नक्की भेटेन. तुला भेटण्याची वेळही लवकरच सांगेन; पण भेटल्यावर तू माझ्यासोबत कुस्ती करणार नाहीस ना..?’ सेहवागने साक्षीला भेटून तिची इच्छा पूर्ण केली. सेहवाग भेटल्यावर साक्षीने सोशल मीडियावर त्याचे आभारदेखील मानले. ट्विटरवर सुरू असलेल्या सेहवागच्या या फटकेबाजीमुळे सोशल मीडियावर सेहवाग हीरो बनला आहे. काही फेक यूजर्स ट्रॉलनी तर सेहवागला ट्रॉल असोसिएशनचे अध्यक्षपददेखील बहाल केले आहे.