पुणे : नागपूरच्या शिवसाई एंटरटेनमेंट निर्मित ‘ते दोन दिवस’ या चित्रपटाला बेस्ट ज्युरी अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. नागपूरकरांनी एकत्र येऊन निर्मिती केलेला हा चित्रपट ‘अंबर भरारी’तर्फे आयोजित अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आला. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मोहन जोशी, सर्वोत्कृष्ट कथेसाठी देवेंद्र बेलनकर यांना गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट नवा चेहरा पुरस्कार प्रसिद्धी आयलवार हिला देण्यात आला. ‘ते दोन दिवस’ ही रूपाली कोंडेवार - मोरे, संजय वाढई, देवेंद्र बेलनकर व सोमेश्वर बालपांडे या निर्मात्यांची पहिलीच कलाकृती आहे.विशेष म्हणजे सर्व जण नागपूरकर असून त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळाले आहे. नागपुरातीलच प्रसिद्ध रंगकर्मी देवेंद्र दोडके यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नागपूर, रामटेक येथे झाले. ‘लोकमत सखी मंच’ मीडिया पार्टनर आहे. महोत्सवात रमा माधव, पोस्टर बॉईज, निळकंठ मास्तर, डॉ. प्रकाश बाबा आमटे, रेनी डे, ड्रीम मॉल, सामर्थ्य, विटी दांडू, सोपानची आई बहिणाबाई, सिंड्रेला यासह २३ चित्रपट सहभागी झाले होते. लोकप्रिय चित्रपट म्हणून अजय देवगण मुव्हीज निर्मित ‘विटी दांडू’ची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कृपासिंधू पिक्चर निर्मित ‘सिंड्रेला’ला मिळाला. देवेंद्र बेलनकर हे नागपूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांच्या पहिल्याच कथेला सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक मिळाले. प्रसिद्धी आयलवार ही नागपूरचे प्रसिद्ध रंगकर्मी किशोर आयलवार यांची मुलगी आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. निर्मात्या रूपाली मोरे या नागपूरच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
‘ते दोन दिवस’चा बेस्ट ज्युरी अॅवॉर्डने गौरव
By admin | Updated: November 7, 2015 02:57 IST