डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट बनवणे ही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या जरी सोपी झाली असली तरी एक कला माध्यम म्हणून लघुपट तयार करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. लघुपट निर्मितीसाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून लघुपटाची मूलभूत संकल्पना, लघुपटाकडे कला व माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन याही बाबी उत्तम कलानिर्मितीसाठी आवश्यक असतात, या जाणिवेतून दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि प्राध्यापक समीर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १० ते १३ डिसेंबर दरम्यान पुण्यात ‘शूट अ शॉर्ट’ या लघुपट निर्मितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एफटीआयआयमध्ये विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी ‘गिरणी’ या चित्रपटासाठी उमेश कुलकर्णी यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. वळू, विहीर, देऊळ आणि हायवे अशा यशस्वी चित्रपटांनंतरही उमेश कुलकर्णी लघुपट बनवत आहेत. आजवर त्यांनी आठ लघुपट बनवले आहेत. त्यातील बहुतांश चित्रपटांची निर्मिती एफटीआयआयने केली आहे. थ्री आॅफ अस या चित्रपटासाठी उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचे राष्ट्रीय पारितोषिक बहाल केले. त्यांनी २००८ मध्ये बनवलेल्या ‘गारूड’ या लघुपटासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण शंख पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या कार्यशाळेत लघुपट करण्याची इच्छा असलेल्यांना लघुपट निर्मिती प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक असे मार्गदर्शन केले जाणार आहे. लघुपटाचा संकल्पना ते निर्मितीपर्यंतचा प्रवास, लघुपट निर्मितीसाठीची आवश्यक पूर्वतयारी, शूटिंगची प्रक्रिया तसेच कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतची कार्यपद्धती, लघुपटाचे संकलन, महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, चित्रपटनिर्मितीशी निगडित असलेली इतर कलाक्षेत्रे यावर सखोल चर्चा कार्यशाळेत केली जाईल. कार्यशाळेनंतर सहभागी विद्यार्थ्यांकडून लघुपटाच्या संहिता मागविण्यात येतील आणि चार निवडक विद्यार्थ्यांच्या लघुपटाची निर्मिती आरोह वेलणकर यांच्या रंगार्थ प्रॉडक्शनतर्फे करण्यात येईल.
एका कल्पनेतून शॉर्ट फिल्मपर्यंतचा प्रवास
By admin | Updated: December 2, 2015 03:17 IST