वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले नाटक. ‘कुणी घर देता घर’ अशी आर्त साद घालणाऱ्या गणपतराव बेलवलकर यांच्या वेदनेचा हुंकार प्रेक्षकांचे हदय हेलावून टाकतो. दत्ता भट, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत दत्त, राजा गोसावी यांनी रंगभूमीवर ‘नटसम्राट’ हे नाटक आणि नाटसम्राट खऱ्या अर्थाने गाजवला. उत्कृष्ट संहिता, संवाद, अभिनय ही नाटकाची वैशिष्ट्य. हे नाटक आता रूपेरी पडद्यावर येत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी हे आव्हान या चित्रपटात पेलले आहे. नुकताच या चित्रपटाचा टे्रलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नाना पाटेकरांनी साकारलेल्या अप्पासाहेब बेलवलवकरांची खास झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळाली आहे. या दर्जेदार कथानकाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. पाटेकर यांच्यासमवेत नेहा पेंडसे, विक्रम गोखले आणि सुनील बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या भेटीला येत आहे.
‘नटसम्राट’चा टे्रलर आउट
By admin | Updated: November 16, 2015 02:25 IST