Join us

आज ‘याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर यांची पुण्यतिथी

By admin | Updated: August 14, 2016 08:08 IST

आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर (किंवा शोकात्म) भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशाल चेंडू तरुण

- संजीव वेलणकर 
 
जन्म:- २१  ऑक्टोबर १९३१  
 
आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर (किंवा शोकात्म) भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशाल चेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, ते पडद्यावरील अभिनेत्याच्या माध्यमातून उपभोगून घेण्याची ही सामान्य माणसाची गरज शम्मी कपूर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाने त्यांना यशाची खरी चव चाखायला मिळाली, तरी तोपर्यंतचे त्यांचे चित्रपट साफ कोसळले होते. इतके की चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी चालविली होती. तेव्हा ‘तुमसा नही देखा’ लोकप्रिय झाला. हिंदी नायकाला लागणारे देखणेपण त्यांच्याकडे होते, पण नायकाची बांधेसूद व कमावलेली देहयष्टी नव्हती. त्यांनी जी वैविध्यपूर्ण नृत्ये केली आहेत, तशी सध्या नृत्याचे पध्दतशीर शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांनाही करणे जमणार नाही. त्यातही पडद्यावरील त्यांची बरीचशी नृत्ये ही त्यांची स्वत:ची होती. त्याकाळी स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक नेमण्याची पध्दत नव्हती. त्यामुळे अभिनेत्याला स्वत:लाच गाण्याच्या भावार्थानुसार नृत्य करावे लागे. धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली आणि गीत संगीताची मेजवानी देत एका पाठोपाठ मनोरंजक चित्रपटांचा धडाका लावणारे म्हणून शम्मी कपूर यांची खासीयत होती.१९६०च्या दशकावर शम्मी कपूर यांनी अधिराज्य गाजविले होते.‘जंगली’ या चित्रपटात त्यांनी ठोकलेल्या ‘याहू’ अशा रोमॅंटिक आरोळीने त्यापुढील चार पिढय़ांवर आपली मोहिनी कायम ठेवली आहे.
ही त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची बेभान अदा यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी आपले एक स्थान निर्माण केले होते. ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘ऍन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूडमध्ये अढळस्थान मिळवून दिले. नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देण्याबद्दल त्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे. जगात नवीन काय घडत आहे, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. संगणक आणि इंटरनेटशी दोस्ती करणार्या भारतातील अगदी प्रारंभीच्या व्यक्तींपैकी शम्मी कपूर हे एक होते. ‘याहू!’ कंपनीने आपले भारतातील कार्यालय सुरू केले तेव्हा शम्मी कपूर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ‘याहू!’शी शम्मी कपूर यांचे असलेले रुपेरी नाते हे जसे त्यास कारण होते, तसेच त्यांचे इंटरनेटचे प्रेम आणि त्याबद्दलची माहिती हेही त्याचे कारण होते. ‘याहू!’ ही त्यांच्या मालकीची वेबसाइट आहे का, अशी विचारणा अनेकदा लोक त्यांना करीत. स्वत:ची वेबसाइट निर्माण करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. मा.शम्मी कपूर यांचे निधन १४ ऑगस्ट २०११ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे मा.शम्मी कपूर यांना आदरांजली. 
 
संदर्भ:- इंटरनेट /  विकिपिडीया
 
मा.शम्मी कपूर यांची अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी..
- यु तो हमने हसी देखे 
- सरपर टोपी लाल
- तुमने पुकारा 
- ये चांद सा रोशन
- दिलके झरोके में
- आज कल तेरे मेरे प्यार के