बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांची चलती असल्याने त्यांच्या तुलनेत आपणही कुठेच मागे नाहीत हे दाखविण्यासाठी अभिनेत्रींना सशक्त भूमिकांचा आधार घ्यावा लागतो. आई, बहीण, प्रेयसी व पत्नी यासारख्या भूमिकांची पारंपरिक चौकट तोडून अॅक्शन भूमिका साकारण्याची हिमंत अभिनेत्रींनी दाखविली आहे. जे काम करिअर म्हणून आपण निवडले आहे तीच भूमिका साकारण्याची संधी फार कमी अभिनेत्रींना मिळाली. मात्र ज्यांना मिळाली त्यांनी या संधीचे सोने केले आहे. चाहत्यांपासून ते समीक्षकापर्यंत त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली.विद्या बालनआपल्या सशक्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन हिने ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात ‘रेशमा’ या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. सिल्क स्मिता ही आपल्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जात होती. या चित्रपटात विद्याने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. दीपिका पादुकोण : फराह खान दिग्दर्शित व सिनेमासृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पादुकोण हिने बॉलिवूड डेब्यू केला. आपल्या पहिल्याच चित्रपटात दीपिकाला अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ‘शांती’ नावाच्या अभिनेत्रीची भूमिका दीपिकाने केली होती. ‘शांती’च्या भूमिकेसाठी दीपिकाची प्रशंसा करण्यात आली. आपल्या पहिल्याच चित्रपटातून चाहते व चित्रपट समीक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात दीपिका यशस्वी ठरली. उर्मिला मातोंडकर : राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटात उर्मिला मातोेंडकर हिने मिली जोशी नावाच्या स्ट्रगलिंग अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. आमिर खान व जॅकी श्रॉफ यासारख्या दिग्गजांसमोर उर्मिलाने साकारलेली मिली चाहत्यांना चांगलीच आवडली. या चित्रपटानंतर उर्मिला मातोंडकरच्या करिअरने चांगलीच झेप घेतली. कंगना राणौत : कं गना राणौतला अशी भूमिका साकारण्याची संधी दुसऱ्यांदा मिळत आहे. कंगनाच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटात ती मिस जुलिया या अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे शूटिंग ‘जुलिया’ या नावाने सुरू झाले होते. यावरून या चित्रपटात कं गनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचा अंदाज लावता येतो. चित्रपटाचा ट्रेलर व गाणे पाहून त्यात कंगनाच केंद्रस्थानी असल्याचे दिसते. मात्र यापूर्वीदेखील कंगनाने अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ या चित्रपटात कंगना रानौतने बॉलिवूड अभिनेत्री रेहानाची भूमिका साकारली होती. ‘वन्स अपॉन...’ हा चित्रपट मुंबईतील तस्कर ‘हाजी मस्तान’ याच्या आयुष्यावर आधारित होता. ही भूमिका सुल्तान मिर्झा या नावाने अजय देवगनने साकारली होती. असे सांगण्यात येते की, हाजी मस्तान हा अभिनेत्री मधुबालाचा फॅन असल्याने त्याने तिच्यासारख्याच दिसणाऱ्या सोना नावाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. हीच भूमिका कंगनाने रेहाना या नावाने साकारली होती.वहिदा रहेमान : अभिनेता व दिग्दर्शक गुरुदत्त यांचा अखेरचा चित्रपट म्हणून ओळखला जाणारा ‘कागज के फुल’ या चित्रपटात वहिदा रहेमान हिने शांती या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. वास्तविक जीवनात वहिदा रहेमान व गुरुदत्त यांच्यात असलेल्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली देणारा हा चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात वहिदा रहेमानचा सशक्त अभिनय पाहायला मिळतो. अनेक चित्रपट जाणकारांच्या मते, हा चित्रपट आपल्या वेळेच्या खूप पूर्वीचा विचार करून तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ८० च्या दशकात नव्याने ओळख मिंळाली.
या अभिनेत्रींनी साकारल्या ‘चित्रपट नायिकां’च्या भूमिका
By admin | Updated: February 6, 2017 04:04 IST