Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यस्पर्धेत पनवेलच्या ‘ती खिडकी’ला तीन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:48 IST

रवींद्र नाट्यमंदिर येथे सोहळा : राज्यातील ४५० नाट्य संस्थांचा सहभाग

पनवेल : जानेवारी महिन्यात राज्यातील १९ केंद्रात पार पडलेल्या राज्य नाट्यस्पर्धेत पनवेलमधील ‘ती खिडकी’ या नाटकाने बाजी मारली. पनवेल केंद्रात पार पडलेल्या या नाटकाला राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेत एकूण तीन पुरस्कार मिळाले आहे. गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात हे पुरस्कार देण्यात आले.

मुंबई, रत्नागिरी, नाशिक, मराठवाडा आदीसह १९ केंद्रामध्ये ही स्पर्धा पार पडली. यापैकी ठाणे आणि रायगडमधील केंद्र हे पनवेल होते. येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडली होती. स्पर्धेत एकूण २४ नाटके सादर करण्यात आली होती. यामध्ये ‘ती खिडकी’ हे नाटक सिटीझन युनिटी फोरम या संस्थेने सादर केले होते.

नाटकाचे दिग्दर्शन मनोहर लिमये यांनी केले. लेखन योगेश सोमण यांनी केले. पनवेल केंद्रातून या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर नेपथ्यमध्ये मनोज कोलगे यांना प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे वैयक्तिक अभिनयात तन्वी परांजपे यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. दोघांनाही दहा हजारांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तर केंद्रात तृतीय क्रमांक आलेल्या ‘ती खिडकी’ नाटकाला २० हजारांचे पारितोषिक आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. मागील तीन वर्षांपासून सिटीझन युनिटी फोरम संस्थेमार्फत या नाट्यस्पर्धेत भाग घेतला जातो.