Join us

येऊ कशी तशी मी नांदायला मधील नायिकेने केले आहे या प्रसिद्ध मराठी चित्रपटात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:52 IST

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील अभिनेत्रीचे नाव अन्विता फलटणकर असून तिने मराठीतील एका प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

ठळक मुद्देटाईमपास या चित्रपटात केतकीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अन्विता झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता ती झी मराठी वरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.

मिश्किल सासू आणि खट्याळ सुनेची अनोखी धमाल येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील नायिका सध्या आपले लक्ष वेधून घेत आहे. या अभिनेत्रीचे नाव अन्विता फलटणकर असून तिने मराठीतील एका प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

रवी जाधवने दिग्दर्शित केलेला टाईमपास हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, भाऊ कदम आणि वैभव मांगले यांच्या मुख्य भूमिका आहेत. तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात केतकीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अन्विता झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता ती झी मराठी वरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. तसेच तिने गर्ल्स या चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली आहे.

लग्न हे केवळ दोन जिवांचे मिलन नसून, त्या एका क्षणात अनेक नवी नाती जन्माला येत असतात. आपलं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो आणि घराचं गोकुळ होतं. अशा नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूची .. नात्यानं या दोघी सासू सून आहेत पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत. या मालिकेची पटकथा सुखदा आयरे यांची असून कथा विस्तार समीर काळभोर यांनी केले आहे. संवाद किरण कुलकर्णी- पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर यांचे आहेत. या मालिकेत शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :झी मराठी