मराठी तसंच हिंदीतही लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या चर्चेत आहे. अनेक ठिकाणी त्या मुलाखती देत आहेत. सर्व मुलाखतींमध्ये त्या एका गोष्टीवर बोलताना दिसतात ते म्हणजे त्या घरात एकट्याच राहतात. वयाच्या ७८ व्या वर्षी त्या सगळं एकटीने करतात. तसंच अजूनही इंडस्ट्रीत काम करतात. नुकत्याच त्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये दिसल्या. त्यांच्यावर एकटं राहण्याची वेळ का आली? आता त्यांना एकटं राहणं आवडतंय का? यावर त्यांनी नुकतंच उत्तर दिलं.
'सुमन म्युझिक मराठी'चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णींना एकटं राहण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, " त्यात काय झालं...आमच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर राज ठाकरेंची मावशी दिघे बाई राहतात. त्या एकट्याच असतात. त्यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत आहेत. आताच एक मुलगी आली होती तिच्यासोबत त्याही तिकडे गेल्या आहेत. आणखी एक गुजराती बाई आहे जी एकटी राहते."
"एकटं राहणं आधी कठीण जातं. पण नंतर आवडायला लागतं. कारण त्याची सवय होते. माणूस सवयीचा गुलाम असतो. तसं मी आता एकटं राहण्यात मास्टर झाली आहे. आता पर्यायच नाहीए, सोबत कोणी नाहीए त्यामुळे आवडायला लागलंय. माझ्या भावाचं ३ बीएचके घर आहे. भाऊ मागच्या वर्षीच गेला. त्याला मूल नाही. माझ्या मुलाला त्यांनीच मोठं केलं. तर माझा मुलगा तिथेच राहतो. आता तिथे भावाची बायको, माझा मुलगा, त्याची बायको आणि त्यांची मुलगी असे ते राहतात. माझ्याकडे राहून फायदा नाही कारण मीच घरात नसते."
उषा नाडकर्णींनी मराठी इंडस्ट्रीतच काम करायला सुरुवात केली. 'पुरुष' हे त्यांचं गाजलेलं नाटक. 'पवित्र रिश्ता' मधली त्यांची सासूची भूमिका तर आजही सर्वांच्या लक्षात आहे. 'वास्तव' या संजय दत्तच्या सिनेमातही त्यांनी लक्षवेधी काम केलं होतं.