Virendra Pradhan: विरेंद्र प्रधान यांना ऐतिहासिक मालिकांच्या दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं. छोट्या पडद्यावरील ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ या गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वाढत्या आत्महत्यांच्या गंभीर मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं आहे.
विरेंद्र प्रधान यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर लक्षवेधी पोस्ट शेअर करुन त्यांच्या मनातील भावनांना वाट मोळकी करुन दिली आहे. विरेंद्र यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, "कलाक्षेत्र आणि आत्महत्या. काही लोकांच्या पोस्ट वाचल्या. कला क्षेत्रातील लोकांच्या आत्महत्या, नैराश्य याबद्दल . कलाक्षेत्रातील आत्महत्या , कर्ज बाजारी होणे , काम नसणे , पैसे न मिळणे किंवा कमी मिळणे , लोकप्रियता नसणे , मी जे करतो त्याची लोकांना किंमत नसणे वगैरे गोष्टींबद्दल कायम बोललं जातं. त्यात सोशल मीडियावर लोक कसे कमेंट्स करतात , किती वरच्या खालच्या पातळीवर चाललंय सगळं याबद्दल ही बोललं जातं. या सगळ्यावर व्यक्त होण्यासाठी मग कोणी कविता करतं , गाणी म्हणतं , निवेदन लिहितं , थोडक्यात व्यक्त होतात सगळे. ज्याला जे जमतं , तसे व्यक्त होतात . मी सहज गूगल केलं तेव्हा अंदाजे समजलं की जगात एकूण ८.१ अब्ज लोकसंख्या आहे . कमी जास्त असू शकते . WHO च्या डेटा नुसार दररोज सरासरी २२०० लोकं आत्महत्या करतात . कमी जास्त आकडा असू शकतो . मी अंदाजे काही तज्ज्ञांशी बोललो , त्या नुसार लक्षात आलं की नैराश्य हे अपेक्षाभंगातून तयार होतं . साधारण अंदाज . पण महत्त्वपूर्ण . अपेक्षाभंग म्हणजे काय , तर मी आयुष्या कडून १० ची अपेक्षा केली , करतो … आणि ४ मिळाले . म्हणजे मायनस ६ चा अपेक्षाभंग झाला . किंवा वाईटात वाईट १ मिळाला तर मायनस ९ चा अपेक्षाभंग . प्लस ४ किंवा प्लस १ चा विचार होत नाही . आपला जो मेंदू आहे , तो मेमरी आणि अनुभवांचा पेटारा आहे . डोळे जसे उघड झाप करतात , तसा हा पेटारा उघडझाप करतो . ज्याचा त्याचा पेटारा . आपल्या पेटाऱ्यात काय घ्यायचं , किती ठेवायचं , किती मोकळं करायचं आणि जे उरेल त्याचा कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा भाग . मला किती हवे ? मग ते पैसे असोत . नात्यांमधील अपेक्षा असो . करियर चे क्षितिज असो . ( क्षितिज हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण ते कधीच गवसत नाही . असो ) किंवा अजून एखादे दुःख असो . निर्माते आपणच . जे काम करतायत , वर्षोंवर्ष काम करतायत , पैसे कमवताहेत ( किती हे पुन्हा क्षितिज आहे ) , रहाटगाडा अखंड सुरू आहे , नवनवीन संध्या उपलब्ध होतायत , नवीन टॅलेंट येतय , नवीन उपक्रम तयार होतायत . हे सगळं होतय ना . नियती एका हाताने घेते , तशी हजार हातानी देते ही . जे गेले ते दुर्दैव आहे . बोच आहे . सल आहे . नुकसान आहे . वेदना आहे."
पुढे त्यांनी लिहिलंय, "पण … आपलं क्षितिज ठरवणं तर आपल्या हातात आहे . लक्षणरेषा हा शब्द उगाच नाही आला आपल्या संस्कृतीत . ते ओलांडल्या मुळे काय घडलं , ते सगळ्यांना माहीत आहे . आपला राम पण माझा . आणि रावण ही माझा . रेषेच्या आत राहिलो तर राम सोबत . रेष ओलांडली की रावण सोबत . आपल्याला ठरवायचं . कलाक्षेत्रातल्या सगळ्या लोकाना रामायण महाभारत ही गोष्ट तर सांगायलाच नको. याच गोष्टींवर आपण हजारो वर्ष आपलं पोट भरतोय. व्यक्त होणे जमले पाहिजे . बोलता यायला पाहिजे. कोणाचा तरी हात पाहिजे . हे सगळे आता जुनाट झाले. कारण यात पुन्हा अपेक्षा आली . कोण कशाला पाहिजे? आणि असं हे कोणी हात देणारं असतं, तर अशा दुर्दैवी गोष्टी घडल्याच नसत्या . ज्यांना हात मिळतो , सोबत मिळते , सांत्वन मिळतं … ते त्यांनी त्यांनी कमावलेलं आहे . तेव्हा आपण कमावलं पाहिजे . आपलं क्षितिज आपण आखलं पाहिजे . पैसे , नातं , यश , करियर …. ही लक्ष्मणरेषा आपण आपली आखली पाहिजे . एखादी दुर्दैवी घटना घडली की त्यावर सगळ्यांना वाईट वाटणार."
आपल्यातल्या रामाला सोडून नका...
"मग अशावेळी सोशल मिडियावर , सोशल मिडियालाच बरे वाईट बोलून , व्यक्त होण्यापेक्षा , आपण आपल्या कडे आणि आपल्या मानसिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे . २५ आणि ३० वर्ष अखंड काम करणारे ही जेव्हा व्यक्त होतात की कसा तो बिचारा , कशी ही वाईट सिस्टिम, कशी ती मराठी कलेची शोकांतिका … तेव्हा खरेच मनापासून वाटते , कला ही तिच आहे . जिने एकेकाळी रंगभूमी , चित्रपट , मालिका इकडे श्रीमंती अनुभवली आहे . श्रीमंती पैशांची किंवा सांस्कृति . कला तिच आहे. कलाकार बदलतोय का हे तपासायला हवे . २ व्हॉयलिन्स आणि एका हार्मोनियम वर ही जगप्रसिद्ध गाणी होऊ शकतात हे सुधीर फडके यांनी दाखवून दिले आहे . घरातले कपडे वापरून ही चित्रपट नाटक उत्तम होऊ शकतात हे भालजी पेंढारकर , हृषिकेश मुखर्जी नी दाखवून दिले आहे . शेवटपर्यंत आपल्याच आखलेल्या क्षितिजात आनंदात आणि समाधानाने जगलेले यशवंत देव , दामू केंकरे , भालजी , राजदत्त , रमेश देव , सुनील गावसकर , सुधीर फडके , भालचंद्र पेंढारकर , गदिमा आणि असे लाखो लोक आपण पाहिले आहेत . आपल्याच क्षितिजात , आपल्याच लक्ष्मणरेषेत आणि कुठल्याही सोशल मिडीयाचा आधार नसताना हे सगळे समाधानी आणि यशस्वी होते . आपण सगळ्या कलावंतांनी या सगळ्यांना वाचलं पाहिजे . मोठ्या आजारातून बाहेर पडून , अंगावर असंख्य मानसिक जखमा घेऊन , राखेतून उभे राहिलेले आज ही महेश मांजरेकरांसारखे लोक उमेद देत नाहीत का ? महेश चे अनेक वर्षाचे सातत्य बघा . अशोक हांडेचे सातत्य बघा . आशा भोसले ने तर नको नको ते सगळे पाहिले एका आयुष्यात . पण अजून ९० व्या वर्षी सातत्य बघा . आत्महत्या हा पर्याय नव्हे . असूच नये . कलाक्षेत्र ही आपली पंढरी आहे . माऊली आपल्यातच आहे . तिला शोधायला बाहेर जाऊ नका . ती सापडणार नाही . क्षिताजासारखी लांब लांब जाईल . मग नैराश्य येणार ना ! हे टोकाचे पाऊल उचलणारे आणि त्यावर सोशली व्यक्त होणारे , यांना माझी विनंती आहे. संवेदना बाळगा पण आपल्यातल्या रामाला सोडू नका." सोशल मीडियावरून आता याबद्दल नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.