Kajalmaya Serial: छोट्या पडद्यावर अलिकडेच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या वाहिन्यांकडून नानविध प्रयोग केले जात आहेत. एकीकडे लपंडाव आणि नशीबवान मालिकेची चर्चा असताना स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच काजळमाया ही थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हॉरर कथेचा अनुभव देणाऱ्या 'काजळमाया' मालिकेत अभिनेता अक्षय केळकर आणि रुई जाईलची महत्त्वाची भूमिका आहे. अलिकडेच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे ही मालिका कधी आणि कुठे पाहता येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं आहे. नुकतीच या मालिकेबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोसह मालिका प्रसारित होण्याची वेळ आणि अन्य कलाकारांची नावे समोर आली आहेत. काजळमाया मालिकेत अक्षय केळकर आणि रुई जाईलसह अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते प्रचंड खुश आहेत. पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू चेटकीणीला चिरतारुण्याचं वरदान लाभलं आहे. दरम्यान, येत्या २७ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वैष्णवी कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'तू चाल पुढं','देवमाणूस २' या मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय 'तिकळी' मालिकेतही ती झळकली.वैष्णवी कल्याणकर ही लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाडची पत्नी आहे. आता नव्या भूमिकेतून वैष्णवी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.