Join us

अभिनेत्याचा जोगश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू; ऑडिशनसाठी जात असतनाच घडला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:55 IST

'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

TV actor Aman Jaiswal Died: टीव्ही इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वाल याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अमन जैस्वालने 'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेमध्ये काम केले होते. २२ वर्षीय अमन जैस्वाल ऑडिशनसाठी जात असतानाच जोगेश्वरी येथे एका ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली. या धडकेत अमनचा मृत्यू झाल्याची माहिती धर्तीपुत्र नंदिनी मालिकेचे लेखक धीरज मिश्रा यांनी दिली. अमनच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

शुक्रवारी दुपारी अमन हा मुंबईतील जोगेश्वरी भागात दुचाकीवरून जात होता. एका ट्रकने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. आंबोली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जयस्वाल याला कामा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने अमनने प्राण सोडला.

धीरज मिश्रा यांनी सोशल मीडियावर अमनला श्रद्धांजली वाहिली आहे. "तू आमच्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहशील, देव कधी कधी किती क्रूर असू शकतो, आज तुझ्या मृत्यूने मला याची जाणीव करून दिली आहे... अलविदा," असं मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमनच्या ओळखीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याला बाइक चालवण्याची आवड होती. मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही तो दुचाकीचा वापर करत असे. अमनला बाईक चालवणे इतकं आवडत होतं की त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाईक चालवतानाचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

अमन हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. धरतीपुत्र नंदिनीमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेमध्ये त्याने यशवंतराव फणसे यांची भूमिका साकारली होती. हा शो २०२१ ते २०२३ मध्ये प्रसारित झाला होता. रवी दुबे आणि सरगुन मेहता यांच्या उडियान या शोचाही तो भाग होता, अमनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. अभिनेता म्हणून नावारुपाला येत असतानाच रस्ते अपघाता त्याचा मृत्यू झाला. तरुण अभिनेत्याच्या जाण्याने टीव्ही कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनमुंबईअपघातमुंबई पोलीस