Join us

टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:48 IST

पाकिस्तानने काल रात्री जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला. टीव्ही अभिनेला कुटुंबियांची चिंता

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाची स्थिती पाहता कालची रात्र आणखी अंगावर शहारे आणणारी होती. पाकिस्तानने काल रात्री जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला. भारतीय सैन्याने तो माघारी परतवत त्यांना रोखठोक उत्तर दिलं. मात्र जम्मूत राहणाऱ्या लोकांमध्ये भीती आहे. काही किलोमीटरवर ड्रोन हल्ले होत असताना जम्मूतील नागरिक घरात घाबरलेल्या स्थितीत आहेत. एका टीव्ही अभिनेत्याचंही कुटुंब जम्मूमध्ये असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

'ये है मोहोब्बते' फेम अभिनेता अली गोनी (Aly Goni) मूळचा जम्मूचा आहे. त्याचं कुटुंब आजही जम्मूमध्ये वास्तव्यास आहे. भारत-पाक मधील तणावाच्या स्थितीत त्याला जम्मूतील आपल्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. काल रात्री त्याने ट्वीट करत लिहिले, "मी भारताबाहेर शूटिंग करत आहे आणि माझं कुटुंब जम्मूमध्ये आहे. माझं इथे अजिबातच लक्ष लागत नाहीये. देवाच्या कृपेने सगळे सुरक्षित आहेत. भारतीय सैन्याचे आभार."

याशिवाय अलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "सुन्न झालोय. जम्मूसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा."

अली सध्या व्हिएतनाममध्ये शूटसाठी गेला आहे. इतर वेळी तो मुंबईत राहतो. मात्र त्याचे आई वडील हे जम्मूमध्ये वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वीच अलीने खुलासा केला की मुस्लिम असल्याने त्याला मुंबईत घर शोधण्यासाठी अनेक अडचणी आल्या. अनेकांनी त्याला 'मुस्लिमांना आम्ही घर देत नाही' असं उत्तर दिलं.

अली गोनी 'ये है मोहोब्बते' या गाजलेल्या मालिकेत होता. शिवाय तो 'बिग बॉस १४' मुळे चर्चेत आला. बिग बॉसमध्येच त्याची ओळख जास्मीन भसीनशी झाली आणि ते प्रेमात पडले. अली आणि जास्मीनचे अनेक चाहते आहेत. तसंच नुकताच अली 'लाफ्टर शेफ' मध्येही दिसला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकारजम्मू-काश्मीरऑपरेशन सिंदूर