Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ

By कोमल खांबे | Updated: December 29, 2025 13:49 IST

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या धनश्रीसाठी अभिनयात करिअर करणं सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा स्ट्रगल सांगितला. 

धनश्री काडगावकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेबांच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. पण, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या धनश्रीसाठी अभिनयात करिअर करणं सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा स्ट्रगल सांगितला. 

धनश्रीने नुकतीच अभिजात मराठीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत स्ट्रगलबद्दल बोलताना तिने सांगितलं की "मी बसने किंवा ट्रेनने जायचे सगळीकडे... मी रिक्षाने नाही जायचे. पैसे सेव्ह करायचे. मी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. तिथे मी एक सूप मिळतं आपलं ज्यामध्ये दोन बाऊल म्हणजे दोन लोकांसाठी सूप व्हायचं. ते एक सूपचं पाकीट मी पाणी घालून घालून आठवडाभर प्यायचे. तो माझा डिनर असायचा. म्हणजे मला कोणी असं सांगितलं नव्हतं की तू पैसे वाचव वगैरे... आणि मी हे कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये. पण मी असंच करायचे. कारण मला पैसे सेव्ह करायचे होते. आणि मला पैसे कमवायचे होते. पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण मी माझ्या घरी खूप असा पैसा बघितलेला नव्हता". 

"अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मी मुलगी होते. आईवडिलांची सगळी धडपड मी पाहिलेली आहे. आम्हाला शिक्षण देऊन त्यांनी एक एक कलाही शिकवल्या होत्या. माझा भाऊसुद्धा उत्तम क्लासिकल गातो. मी क्लासिकल डान्स शिकलेली मुलगी आहे. या सगळ्यासाठी होणारा खर्च, त्यांची धडपड, तो स्ट्रगल मी बघितलेला होता. त्यामुळे पैसा किती महत्त्वाचा आहे हे मला माहिती होतं. तेव्हापासून मी ठरवलं होतं की आपल्याला सेव्ह करायचंय आणि छान राहायचंय. मुंबईत घर घ्यायचंय हे देखील मी ठरवलं होतं. ते आठ दिवस पुरवलेलं एक सूप आज कामी आलेलं आहे", असंही धनश्रीने पुढे सांगितलं.  

टॅग्स :टिव्ही कलाकारधनश्री काडगावकर