Join us  

ती परत आलीये: थाटात पार पडणार रोहिणीचं डोहाळ जेवण; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 6:13 PM

Ti parat aaliye: आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती परत आल्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींची झोप उडाली आहे.

ठळक मुद्देया गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजे ती परत आलीये. ही मालिका सध्या लोकप्रिय होत असून अगदी पहिल्या भागापासूनच तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती परत आल्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींची झोप उडाली आहे. तिने अनेकांचे प्राण घेतले आहेत. त्यामुळे सध्या रिसॉर्टवर अडकलेला प्रत्येक जण भयभीत झाला आहे. मात्र, याच काळात रोहिणी लवकरच एक गोड बातमी देणार आहे. त्यामुळे दहशतीखाली वावरत असलेले सगळे जण काही काळासाठी सगळं विसरणार आहेत. 

रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात.वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी अगदी उत्साहात रोहिणीचं डोहाळे जेवण साजरी करण्यात येणार आहे आणि त्यात कुणी तरी येणार येणार हं गाणं देखील असणार आहे. या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे थिरकताना दिसतील. 

या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली आणि या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सना देखील सर्व कलाकारांची शुटिंगदरम्यान चालली मजा मस्ती पाहून धमाल येतेय. ती परत आलीये मालिकेत आलेले हे आनंदाचे क्षण किती वेळ टिकतील? या आनंदावर विरजण पाडण्यासाठी 'ती' काही अघटित घडवून आणणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसिनेमामराठी