Join us

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेने गाठला ३०० भागांचा टप्पा! कलाकारांनी 'असा' साजरा केला क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:36 IST

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचे ३०० भाग पूर्ण! मुख्य अभिनेता म्हणाला- "यश हे कधीच कुणा एकट्याचं..."

Thoda Tujha Aani Thod Majha: मनोरंजनासाठी OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर सामग्री उपलब्ध आहे. पण आजही अनेकांना टीव्हीवर मालिका किंवा सिनेमे पाहायला आवडतात. छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत चालल्या आहेत. अशीच एक मालिका जी गेल्या वर्षभरापासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. या मालिकेचं नाव थोडं तुझं आणि थोडं माझं आहे. नुकताच या मालिकेने ३०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेत तेजसची भूमिका साकारणा अभिनेता समीर परांजपे याने खास पोस्ट लिहिली आहे. 

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत अभिनेता समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका आहे. या मालिकेत त्याने साकारलेल्या मानसी आणि तेजस या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. गेल्या वर्षी १७ जून रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. बघता बघता या मालिकेने ३०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. यानिमित्ताने संपूर्ण टीमने जंगी सेलिब्रेशन केलं. अशातच अभिनेता समीर परांजपमने या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता स्टेज परफॉर्म करत 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचं टायटल सॉंग गाताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील इतरही कलाकार पाहायला मिळत आहेत. 

समीर परांजपेने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, "300 Not out...! 'थोडं तुझं आणि थोडं माझं' च्या संपूर्ण टीमची मेहनत आणि सहकार्यामुळे ३०० भागांचा टप्पा आम्ही गाठला…यश हे कधीच कुणा एकट्याचं नसतं…त्यात सर्वात मोठा वाटा हा तुम्हा रसिक प्रेक्षकांचा आहे…. असंच थोडं तुमचं आणि थोडं आमचं करत अनेक टप्पे पार करूया...असं सुंदर कॅप्शन लिहित अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया