मराठी दूरचित्रवाहिन्यांच्या इतिहासात दामिनी या मालिकेने इतिहास घडवला होता. नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारणाला सुरुवात झालेली दामिनी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून कमालीची लोकप्रिय झाली होती. १९९७ ते २००७ या काळात सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकेत प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनीची भूमिका निभावली होती. दरम्यान, आता दामिनी ही मालिका पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. दामिनी २.० या नावाने ही मालिका लवकरच प्रसारित होणार आहे.
दामिनी २.० या मालिकेचा प्रोमो नुकताच लोकप्रिय असलेल्या जुन्या शीर्षकगीतासह दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या इन्स्टा अकाउंटवरून प्रसारित करण्यात आला आहे. अन्यायाविरुद्ध नेहमीच ठामपणे उभी राहणारी निर्भिड पत्रकार दामिनी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतेय नव्या रूपात नव्या ताकदीसह असे या प्रोमोमध्ये म्हटले आहे. मात्र ही मालिका कधीपासून प्रसारित होणार त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दूरदर्शनवर याआधी प्रसारित झालेल्या दामिनी या मालिकेमध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी पत्रकार दामिनीची भूमिका साकारली होती. मात्र आता दामिनी २.० या मालिकेमध्ये प्रतीक्षा लोणकर या दामिनीच्या भूमिकेत दिसणार नाहीत. तर सुप्रिती शिवलकर ही दामिनीची भूमिका साकारणार आहे. तसेच नवी दामिनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या रूपात दिसणार आहे. दरम्यान, या मालिकेच्या चित्रिकरणास सुरुवात झाल्याचे संकेत अभिनेत्री सुप्रिती शिवलकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून मिळत आहेत.