Join us

'फुलाला सुगंध मातीचा'मधून या अभिनेत्रीची एक्झिट, तिच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 13:11 IST

Phulala Sugandh Maticha : मागील दोन वर्षांपासून फुलाला सुगंध मातीचा मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शुभम आणि कीर्तीच्या जुळून आलेल्या लव्ह स्टोरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेने काही दिवस तर टीआरपीच्या बाबतीत प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. मालिका सुरळीत चालू असताना आता या मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत सोनालीचे पात्र साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये(Aishwarya Shetye)ने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.

सोनाली पात्राच्या भूमिकेत आता अभिनेत्री कांचन प्रकाश (Kanchan Prakash) दिसणार आहे. ऐश्वर्या शेट्ये हिने सोनालीचे पात्र आपल्या सहजसुंदर अभिनयाने साकारले होते. मात्र काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागत आहे. या मालिकेअगोदर ऐश्वर्याने ऑल मोस्ट सुफळसंपूर्ण मालिकेतून काम केले होते. ऐश्वर्याच्या जागी आता सोनालीच्या भूमिकेत कांचन प्रकाश झळकणार आहे. 

या भूमिकेबाबत कांचन प्रकाश म्हणाली की, मी आजपासून तुम्हाला भेटायला येतेय सोनालीच्या भूमिकेत. फुलाला सुगंध मातीचामध्ये आधीच्या सोनालीने तुम्हा सर्वांची मनं जिंकलेली आहेत. मी आशा करते की तुम्ही तेवढंच प्रेम मलाही द्याल तू ऐश्वर्या शेटे या भूमिकेला खूप उंचावर नेऊन ठेवलेस आणि मी ती उंची गाठायचा प्रयत्न नक्की करेन पाहायला विसरू नका.

कांचन प्रकाश ही मालिका तसेच नाट्य अभिनेत्री आहे. हौशी नाटकातून काम करत असताना कांचनने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत कांचनने सगुणाचे पात्र साकारले होते. ऐतिहासिक मालिका आणि सगुणाचे दमदार पात्र यामुळे कांचनचे मोठे कौतुक करण्यात आले होते. प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून कांचनने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले. तुझ्या इश्काचा नाद खुळा, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा अशा मालिकांमधून कांचन महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. फुलाला सुगंध मातीचा या गाजलेल्या मालिकेत सोनालीचे पात्र साकारण्याची संधी तिला मिळाली आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह