Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:04 IST

आपले कलाकार स्पर्धक वाहिनीवर जात आहेत या स्पर्धेबद्दल काय वाटतं? सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan)  सध्या चर्चेत आहे. 'होणार सून मी या घरची' गाजवल्यानंतर इतक्या वर्षांनी ती पुन्हा झी मराठीवर कमबॅक करत आहे. याआधी ती स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट'मध्ये दिसत होती. मात्र तिने ती मालिका मध्येच सोडली. याचीही खूप चर्चा झाली होती. तेजश्रीने मालिका का सोडली हे शेवटपर्यंत समोर आलं नव्हतं. आता ती पुन्हा झी मराठीवर जात असल्याने चाहते उत्सुक आहेत. दरम्यान यावर स्टार प्रवाह वाहिनीचे हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपले कलाकार स्पर्धक वाहिनीवर जात आहेत या स्पर्धेबद्दल काय वाटतं? यावर 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडे म्हणाले, "ती नायिका आधीही स्पर्धक वाहिनीकडेच होती. त्यानंतर ती आमच्याकडे आली होती. मला वाटतं आमची स्पर्धा कोणाशीही नाही. आमची स्पर्धा स्वत:शीच आहे. दुसरीकडे काय चाललंय याची चर्चा आम्ही नक्कीच करतो. आपण एका व्यवसायात आहोत, तो कसा चांगला चालावा, वृद्धिंगत होत राहावा म्हणून वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा कराव्या लागतात. दुसऱ्या वाहिनीशी स्पर्धा करण्यापेक्षा आमची स्पर्धा स्वत:शीच आहे. आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करत राहावं, आपल्या मालिका रसिक-प्रेक्षक जास्तीत जास्त कशा बघत राहतील याकडे कल आहे."

ते पुढे म्हणाले,"आमचे कलाकार स्पर्धकांकडे गेले किंवा तिकडून आमच्याकडे आले यावर मला वाटतं मराठीसृष्टी एक आहे. फार मोजके कलाकार आहेत जे नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करतात. त्यामुळे कोणीही कलाकार हा आमचा आहे की तुमचा असा त्यावर स्टॅम्प लावणं चुकीचं आहे. रसिक प्रेक्षकांसमोर तो कलाकार कुठेही दिसला तरी तो आपलाच आहे."

तेजश्री प्रधान झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. हिंदी मालिका 'बडे अच्छे लगते है'ची ही मालिका रिमेक आहे. 

टॅग्स :सतिश राजवाडेतेजश्री प्रधान मराठी अभिनेतास्टार प्रवाहझी मराठी