सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी होताना दिसत आहे. उद्या अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव हा सगळ्यांच्या आवडीचा उत्सव आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कलाकार मंडळीदेखील गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. दरम्यान सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने देखील त्यांच्या घरच्या बाप्पाबद्दल सांगितले आहे आणि यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करणार आहे, हेदेखील सांगितले.
सध्या तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, "आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो, या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. म्हणजे मला लक्षात आहे कि माझा जन्म झाल्यापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत असताना पहिली आहे."
"मोदक खाणं टाळणं खूप अवघड आहे"
ती पुढे म्हणाली की, "गणपती उत्सवात मला सर्वात जास्त मोदक आवडतात, डायट असो काही असो मोदक खाणं टाळणं खूप अवघड आहे. मोदक आणि माझी वीण खूप घट्ट आहे.त्यामुळे मी उपाशी राहीन पण मोदक नक्की खाईन. गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत जिथे मी सोसायटी कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कला सादर केल्या आहेत आणि बहुतेक बाप्पा त्याच्या समोर सादर केलेली ती कला त्यांच्याच आशिर्वादाने मला आज इथवर घेऊन आली आहे."