प्रियदर्शन जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत काम करून प्रियदर्शनने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा प्रियदर्शन एक हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याचं कॉमेडीचं टायमिंगही अगदी परफेक्ट असतं. एक अभिनेता असण्यासोबतच प्रियदर्शन उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. सध्या तो '२ वाजून २२ मिनिटं' या नाटकाचे प्रयोग करत आहे.
'२ वाजून २२ मिनिटं' या नाटकाच्या प्रयोगाला बॉलिवूड अभिनेत्री तबूने हजेरी लावली होती. नाटक पाहिल्यानंतर तबूने प्रियदर्शनचं कौतुक केलं. "तू खूप छान काम करतोस", असं तबू म्हणाली. तबूच्या कौतुकाने भारावलेल्या प्रियदर्शनने पोस्ट शेअर केली आहे. "२ wajun २२ मिनिटांनी च्या १००व्या प्रयोगाला तबू आली होती.म्हणाली - You're too good! माचिस , हेराफेरी , अस्तित्व , विरासत, हुतूतू , चांदणी बार , मकबूल , चिनी कम, हैदर , The namesake, इरुवर , biwi no १ , दृश्यम आणि अशा कित्येक उत्तम सिनेमात जिने अफलातून काम केलं अशा नटीने You're too good म्हटलं... लई झालं भावांनो!", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "नाटक पाहून कुणी कौतुक केलं की २-४ दिवस जरा वजन वाढतं. तेवढं चालतंय... नाहीतर आमचं वजन वाढणार तरी कधी?". दरम्यान, प्रियदर्शनच्या या '२ वाजून २२ मिनिटं' नाटकात रसिका सुनील, अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. प्रियदर्शन जाधव 'चला हवा येऊ द्या' मधुनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.