Join us

"मराठी माणूस, महाराष्ट्राला बदनाम..." हिंदी-मराठी वादावर अभिनेत्याचं भाष्य, VIDEO चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:07 IST

अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक सडेतोड आणि भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषिक वाद चांगलाच पेटलेला आहे.  अनेक राजकीय आणि सामाजिक पातळ्यांवर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. सोशल मीडियावर अमराठी लोकांवर होणारे हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच, मराठी माणूस आणि मराठी मानसिकतेविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक सडेतोड आणि भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मराठी माणसाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही, कारण देशप्रेम त्याच्या नसानसांत भिनलेलं आहे. तसेच मराठी मानसिकतेच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करत, प्रेम, समजूतदारी आणि भाषिक सौहार्दाचा संदेश दिला आहे.

स्वप्नील राजशेखर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ते म्हणाले, "आम्ही मराठी लोक… मग तो सामान्य मराठी माणूस असो किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा छोटा-मोठा नेता असो. तो कायम 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणतो. आजपर्यंत कोणीच 'जय महाराष्ट्र' आधी आणि नंतर 'जय हिंद' असं म्हटलेलं नाही. आपल्या भारतीय सैन्याच पाहा ना… भारतातल्या प्रत्येक भागातून आणि महाराष्ट्रातूनही अनेक तरुण सैन्यात भरती होत आले आहेत. देशासाठी आपलं बलिदान देत आलेत".

मराठी माणसाच्या मानसिकतेबद्दल ते म्हणाले, "मराठी मानसिकता जर संकुचित असती तर इतक्या वर्षांपासून जे अमराठी लोक महाराष्ट्रात राहत आहेत, जे दुधात साखर मिसळते तसे मिसळून गेले आहेत, जे मराठी लोकांबरोबर चांगली मराठी भाषा बोलतात आणि इथली संस्कृती जाणतात, तसंच जे इथे राहून आपला उदरनिर्वाह करतात ते हे सगळं करू शकले असते का? आज भाषेमुळे जे वातावरण बिघडलं आहे, त्यामागे काहीतरी कारण आहे. मराठी माणूस उगाच संवेदनशील झाला नाहीये. मराठी मानसिकता अजिबात संकुचित नाही". 

संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेसाठी योगदान दिलं आहे, त्यांनी मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड असल्याचं वर्णन केलं आहे. यासोबतच त्यांनी विश्व हे आपलं कुटुंब असल्याचंही म्हटलंय. मराठी माणसांवर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. आज जे लोकशाही आणि संविधानाबद्दल बोलत आहेत, ते संविधान एका मराठी माणसानेच म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी आपल्याला दिलं आहे. हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा जबरदस्ती हासुद्धा कुठल्या प्रश्नावरील पर्याय नाही, हे आम्हीही मान्य करतो".

स्वप्नील म्हणाले, "जर एखादा मराठी माणूस तुम्हाला मराठी बोलण्यासाठी आग्रह करेल, तर तुम्ही त्याला 'मला मराठी येत नाही; पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन, जय महाराष्ट्र' असं प्रेमाने सांगू शकता. तोडक्या मोडक्या मराठीत तुम्ही दोन वाक्य बोललात, तरी जो तुमचा गळा पकडायला आला आहे, तो तुमची गळाभेट घेईल. मी भारतातल्या कोणत्याही प्रदेशात जातो, तेव्हा मी तिथली भाषा आणि संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मला तिथली भाषा बोलता येत नसेल, पण मी त्याचा आदर करतो. तुम्हीही असं प्रेमाने वागलात तर तो मुद्दा तिथंच संपेल".

हिंदी शिकण्याच्या मुद्द्यावर ते म्हणतात, "हिंदी ही भाषा एखाद्या मराठी माणसाला शाळेत शिकवायची गरज नाही. हिंदी चित्रपटांनी ते काम केलं आहे. मी जे बोलत आहे, ते मी कुठल्या शाळेत शिकलेलो नाही. मी हे अनेक हिंदी चित्रपटांमधूनच शिकलो आहे. पण काही लोक मराठी भाषेचा या मुद्द्याला नीट समजून न घेता व्हिडीओ बनवत आहेत आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. मराठी माणसाला देशभक्तीबद्दल सांगत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही उगाच ही गोष्ट बिघडवत आहात. पुन्हा एकदा सांगतो, मराठी माणसाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. त्याच्या नसानसांत देशभक्ती आहे. आम्ही कायमच 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणत आलो आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र", असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलाय.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारमराठीहिंदी