Vin Doghatli Hi Tutena : छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत कायम चढाओढ असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता नुकताच झी मराठीने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेतून कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत मालिकेचा झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे. त्याचबरोबर मालिकेचं नाव, कथानक आणि कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा हटविण्यात आला आहे. 'वीण दोघांतली ही तूटेना' असं या मालिकेचं नाव असणार आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. "नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं आणि न ठरवता 'प्रेम".
'वीण दोघांतली ही तूटेना' या मालिकेत प्रेक्षकांना समर आणि स्वानंदी यांची अनोखी कहाणी पाहायला मिळणार आहे. लग्नाच्या विषयावरच ही मालिका आधारित आहे. आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.
सुबोध भावे-तेजश्रीची पुन्हा जमणार जोडी...
सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमा काही महिन्यांपूर्वीच आला होता. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यांच्या जोडीला चाहत्यांची पसंतीही मिळाली. या सिनेमाचा विषयही असाच काहीसा होता. लग्नाचं वय उलटत असताना जोडीदार शोधता शोधता दोघं एकमेकांना भेटतात असा तो सिनेमा होता. आता मालिकेत यापेक्षा काय वेगळं असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.